Mangal Prabhat Lodha : महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच ३५० रात्र अभ्यासिका सुरू होणार

रात्र अभ्यासिका वर्गाचा शुभारंभ पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवारी ८ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आला

187
 Mangal Prabhat Lodha : महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच ३५० रात्र अभ्यासिका सुरू होणार
 Mangal Prabhat Lodha : महानगरपालिकेच्या शाळांमध्ये लवकरच ३५० रात्र अभ्यासिका सुरू होणार
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत अनेक कुटुंब छोट्या घरात राहत असल्याने अशा कुटुंबातील मुलांना अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी  विचारात घेता महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने आपल्या शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पहिले पाऊल आज नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूलमध्ये पहिल्या रात्र अभ्यासिकेच्या शुभारंभाद्वारे टाकण्यात असून  लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ३५० रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे, असे राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी जाहीर केले.
अंधेरी (पूर्व) येथील कोलडोंगरी (सहार मार्ग) परिसरातील नित्यानंद मार्ग मुंबई पब्लिक स्कूल येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतंर्गत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रात्र अभ्यासिका वर्गाचा शुभारंभ राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते शुक्रवारी ८ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे आमदार  पराग अळवणी, माजी नगरसेवक अभिजित सामंत, ‘के पूर्व’ विभागाचे सहायक आयुक्त  मनीष वळंजू, उत्कर्ष मंडळाचे विलास तावडे, आचार्य  पवन त्रिपाठी, माजी नगरसेवक मुरजी पटेल,  महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  राजू तडवी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सायंकाळी रात्र अभ्यासिका सुरू कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी  महानगरपालिकेला दिले होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, सह आयुक्त (शिक्षण)  गंगाथरण डी. यांनी शिक्षण विभागाला याबाबत अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शिक्षण विभागाकडून पहिली रात्र अभ्यासिका नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूलमध्ये सुरू करण्यात आली आहे.
या सोहळ्यात बोलतांना पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरात लिहावा असा आहे. अतिशय कमी वेळेत रात्र अभ्यासिका उभारणाऱ्या यंत्रणेचे अभिनंदन करायला हवे. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी अशा प्रकारच्या रात्र अभ्यासिका नक्कीच फायदेशीर ठरतील, असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला.  त्यामुळे लवकरच  महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येतील आणि त्याठिकाणी विद्यार्थी अभ्यास करू शकतील, असे ते म्हणाले.

(हेही वाचा-Kamal Hasan Supports Stalin : कमल हसन यांचे उदयनिधी स्टॅलिन यांना समर्थन; म्हणे, उदयनिधी यांना सनातनवर आपले मत मांडण्याचा अधिकार आहे)

आमदार श्री. पराग अळवणी म्हणाले की, मुंबईतील शिक्षण, स्वच्छता आणि उद्यान विभागांसाठी पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा यांचे योगदान मोठे आहे. तसेच अतिक्रमण निर्मूलन या विषयातही  लोढा यांनी लक्ष घातले आहे. शिक्षण विभागातील रात्र अभ्यासिकांमुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख उंचावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, महानगरपलिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रत्येक इमारतीत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहेत. यात मुले आणि मुलींसाठी प्रत्येकी वेगळी खोली असेल. सध्या सायंकाळी सहा ते रात्री आठ असे दोन तास ही रात्र अभ्यासिका सुरू राहणार आहे. मुले आणि पालकांच्या मागणीनुसार अभ्यासिकेची वेळ वाढविण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
रात्र अभ्यासिका ही महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या तसेच परिसरातील खासगी शाळेत शिकणाऱ्या ९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. महानगरपालिकेच्या ज्या शाळांमध्ये तळमजल्यावर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याकरीता स्वतंत्र वर्गखोली उपलब्ध असेल, अशा इमारतीत अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून त्यांची संमती असलेला व विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती असलेला अर्ज मागविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शाळा ओळखपत्र व आधार कार्ड यांची तपासणी करुनच अभ्यासिकेसाठी प्रवेश देण्यात येईल. तसेच प्रवेशानंतर विद्यार्थ्यास स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येणार आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी जवळच्या महानगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.