भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील १८ व्या ‘जी—20’ (G-20 Summit) शिखर परिषदेचे उद्घाटन शनिवार (९ सप्टेंबर) रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे होणार आहे. यावेळी २० देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अतिथी देश, प्रमुख जागतिक संस्था आणि प्रादेशिक संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, जागतिक नेत्यांचे नवी दिल्लीत आगमन सुरू झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक नवी दिल्लीत पोहोचले आहेत. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस गुटेरेस हेही राजधानीत पोहोचले आहेत.
जी—20 शिखर परिषदेची माहिती देताना भारताचे शेरपा अमिताभ कांत यांनी पत्रकारांना सांगितले की, G-20 शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी रविवारी दिल्लीत संयुक्त वक्तव्य जारी केले जाईल. याला सर्व देशांनी सहमती दर्शवली आहे. या मुद्यावर सर्व सदस्य देशांच्या शेरपांनी आपले मत आणि सूचना दिल्या आहेत. यावर त्या त्या देशांच्या प्रमुखांसोबत चर्चा होईल. यावर राष्ट्रप्रमुखांकडून निर्णय झाला की संयुक्त वक्तव्याच्या रूपात आपल्यासमोर मांडले जाईल, असे त्यांनी सांगितले. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी यावेळी उत्तर दिले.
दरम्यान, जी—20 शिखर परिषदेला कव्हर करण्यासाठी जगाच्या विविध देशांतील प्रसार माध्यमांचे पत्रकार येथे पोहचले आहेत. कांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास तीन हजार पत्रकार येथे जमले आहेत. देशांतील प्रसारमाध्यमे कार्यक्रमस्थळी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये जमले आहेत. जी—20 शिखर परिषदेचे कव्हरेज करण्यासाठी अनेक देशांतील माध्यमकर्मी राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे शुक्रवारी आयएमसीमध्ये जोरदार हालचाली दिसून आल्या.
तीन दिवसांची सुट्टी जाहीर
दुसरीकडे राजधानी दिल्लीत दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी राजधानी दिल्लीमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जी—20 च्या कार्यक्रमामुळे दिल्लीत तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रगती मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
G-20 बैठका देशव्यापी झाल्या
शुक्रवारी, जी—20 शिखर परिषदेचे (G-20 Summit)संयोजक हर्ष श्रृंगला म्हणाले की, जी—20 शिखर परिषदेच्या बैठका देशव्यापी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या नेतृत्वाखाली देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वर्षभर विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले. सुमारे 300 प्रकारचे विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. ज्यामध्ये सुमारे आठ हजार कलाकार सहभागी झाले होते. याद्वारे G-20 देशांनी भारताची विविधता आणि सांस्कृतिक वारसा जवळून पाहिला आणि समजून घेतला.
(हेही वाचा : BEST Bus : माऊंट मेरी यात्रेसाठी वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकावरून अतिरिक्त बेस्ट बसगाडया)
परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले की, शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी G-20 च्या घोषणेनुसार बैठका होणार आहेत. यामध्ये ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ यानुसार तीन वेगवेगळी सत्रे होणार आहेत. ज्यामध्ये सदस्य देशव्यापी चर्चा करतील. याशिवाय सदस्य देशांचे नेते राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहतील.
पीएम मोदी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी स्वतंत्रपणे द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यामध्ये चर्चेच्या विविध मुद्द्यांचा समावेश असेल. खरं तर, अनेक देशांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना चर्चेसाठी आग्रह केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community