Ganeshotsav 2023 : गणपतीच्या मिरवणूका, खरेदीमुळे रस्ते गजबजले

वाहतुकीत मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले

82
Ganeshotsav 2023 : गणपतीच्या मिरवणूका, खरेदीमुळे रस्ते गजबजले
Ganeshotsav 2023 : गणपतीच्या मिरवणूका, खरेदीमुळे रस्ते गजबजले

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) खरेदीनिमित्त रस्त्यांवर वाढलेली वाहने आणि गणेश आगमन मिरवणुकांमुळे मुंबई, ठाण्यात वाहतूक कोंडीचे विघ्न उभे ठाकले आहे. मुंबईत मोठय़ा सार्वजनिक मंडळांच्या उंच गणेशमूर्ती शनिवारी मंडपस्थळी मार्गस्थ झाल्या. ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण करीत मोठय़ा संख्येने तरुणाई या मिरवणुकीत सहभागी झाली होती.दोन्ही शहरांतील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर रविवारी (१० सप्टेंबर) वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र दिसत होते.

लालबाग, परळ, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा आणि आसपासच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली. बसचे मार्गही बदलण्यात आले. नरेपार्कमधील परळचा राजा, चिराबाजारचा महाराजा, गिरगावचा विघ्नहर्ता, अ‍ॅन्टॉपहिलचा राजा, अंधेरीचा महाराजा, कुंभारवाडय़ाचा राजा, मुंबईचा महाराजाधिराज, मरोळचा राजा, विक्रोळी पार्कसाईटचा आराध्य, काळेवाडीचा विघ्नहर्ता, ताडदेवचा विघ्नहर्ता, अंधेरीचा पेशवा, फोर्टचा देवामहागणपती यासह भाईंदर, वसई परिसरातील गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती शनिवारी कार्यशाळांमधून मंडपस्थळाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. त्यामुळे वाहतुकीत मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात आले होते.

(हेही वाचा : G-20 Summit : ‘देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय…’ जी-20 परिषदेसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण)

ठाणे शहरातील मुख्य आणि अंतर्गत मार्गावरही दिवसभर वाहतूक कोंडीचे चित्र होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास मुंब्रा बाह्यवळण मार्गावर ठाण्याहून मुंब्र्याकडे जाणाऱ्या एका टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर उलटला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरु असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच शनिवारी सुट्टीनिमित्त गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी अनेकजण वाहने घेऊन घराबाहेर पडल्याने कोंडीत भर पडली. कापूरबावडी, मानपाडा, माजिवडा, ढोकाळी, वाघबीळबरोबरच शहरातील अंतर्गत मार्गावरही वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.