विशेष प्रतिनिधी, मुंबई
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना या काळात पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीत महापालिकेच्या वतीने गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पर्यावरण पूरक आणि इतर मूर्ती यावर शिक्के मारले जात आहेत. ज्यामुळे दोन्हीं प्रकारच्या मूर्ती ओळखणे शक्य होते. परंतु गणेशोत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा अशी मागणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली आहे.
“गणेशोत्सव हा अतिशय आस्थेचा विषय आहे, मुंबईत या उत्सवाचे विशेष महत्व आहे, प्रत्येक व्यक्ती गणेशाच्या मूर्तीला पवित्र मानून त्याची मनोभावे पूजा करतो. त्यामुळे उत्सव काळात कोणाच्याही श्रद्धेला धक्का लागणार नाही,याची बारकाईने काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर मूर्तींवर शिक्का मारणे किंवा रंग देणे योग्य नाही! यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे लोढा यांनी या पत्रात म्हटले आहे.
पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी मूर्तीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी किंवा शिक्केबाजी नको, त्याऐवजी दुसरा पर्याय शोधण्याबाबत महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी आपण स्वतः बोलत आहे.” असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community