मुंबईतील सर्वात मोठा उत्सव म्हटलं की गणेशोत्सव. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त लाखोंच्या संख्येने मुंबईत लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते. हजारोंच्या संख्येने पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात केले जातात. यंदा पोलिसांच्या मदतीला मुंबईतील प्रत्येक गणेश मंडळात पोलिसांकडून ‘गणसेवक’ नेमले जाणार आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती सोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
मुंबईत होणारा गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाला गालबोट लागू नये, तसेच पोलिस आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई तसेच उपनगरात लहान-मोठे असे हजारो गणेश मंडळे आहेत. लहान-मोठ्या गणेशोत्सव मंडळांतही गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते असते.
(हेही वाचा – Naseeruddin Shah : नसरुद्दीन शाह म्हणाले, द काश्मीर फाईल्स, द केरळ स्टोरी, गदर 2 चित्रपट हिट झाल्याचा त्रास झाला)
तसेच आगमन-विसर्जना वेळीही प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक गणपती मिरवणुकीत सहभागी होत असतात. अशावेळी बॉम्बस्फोट सदृश स्थिती किंवा दहशतवादी हल्ल्याचा धोका संभवतो. अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिसांना मदत म्हणून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या जवळपास एक लाख गणसेवकांची फौज तयार केली जाणार आहे. मोठ्या मंडळात २० तर लहान मंडळात १० कार्यकर्ते ‘गणसेवक’ म्हणून निवडले जातील. हे गणसेवक पोलिसांशी वेळोवेळी समन्वय ठेवतील. गणसेवकांना पोलिसांकडून गणेशोत्सव पूर्व सुरक्षिततेविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे.
प्रत्येक मंडळातील नेमलेल्या गणसेवकांना पोलिसांकडून ओळखपत्रही दिले जाणार आहे. जवळपास एक लाख गणसेवक हे आपापल्या मंडळाच्या मंडप आणि त्याच्या परिसराची देखरेख करतील. मंडप परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर व त्यांच्या हालचालींवर गणसेवक लक्ष ठेवून असतील व त्यात काही गैर आढळून आल्यास स्थानिक पोलिसांना त्यांची माहिती देतील. मंडपाजवळ किंवा परिसरात एखादे संशयास्पद वाहन पार्क केलेले असल्यास त्यांची माहिती त्वरित पोलिसांना दिली जाईल इत्यादी कामगिरी गणसेवकांवर सोपवली जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community