भांडुपमधील ड्रिम मॉलमध्ये काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली. या आगीमुळे इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटलमधील ११ रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईतील सर्व खाजगी रुग्णालये, सरकारी रुग्णालये यांचे अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून परिक्षण(ऑडिट) करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी अग्निशमन दलाला दिले आहेत. त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिले आहेत.
स्थायी समितीत केली होती मागणी
तीन महिन्यांपूर्वी नागपाडयातील सिटी मॉलला आग लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी भांडुप येथील ड्रिम मॉलला आग लागून, चौथ्या मजल्यावर असलेल्या रुग्णालयातील कोविड रुग्णांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. आयसीयूमध्ये उपचार घेणारे ११ रुग्ण या धुरामुळे जागच्या जागीच मृत्यू पावले. या आगीच्या घटनेनंतर स्थायी समितीच्या बैठकीत याचे तीव्र पडसाद उमटले होते. समितीने प्रत्येक रुग्णालयांचे तसेच मॉलचे आग प्रतिबंधक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ऑडिट करण्याची मागणी केली होती.
(हेही वाचाः शिक्षण समिती अध्यक्षपदी सेनेच्या संध्या दोशी!)
थेट कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश
स्थायी समितीत केलेल्या मागणाीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ५ एप्रिल रोजी मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निर्देश देत परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकामध्ये आयुक्तांनी खाजगी रुग्णालये, सरकारी रुग्णालये तसेच महापालिका रुग्णालये आदी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम २००६ अंतर्गत अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून ऑडिट करण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी थेट सर्व खाजगी रुग्णालये, सरकारी रुग्णालये तसेच महापालिकेच्या रुग्णालयांची तपासणी करावी. जर या तपासणाीमध्ये त्रुटी आढळून आल्यास, त्यांच्यावर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे या सर्व रुग्णालयांची अग्निसुरक्षेच्या माध्यमातून तपासणी करुन, त्याचा अहवाल पुढील १५ दिवसांमध्ये करण्याचे निर्देशही आयुक्तांनी मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Join Our WhatsApp Community