Cabinet Meeting In Marathwada : तब्बल ७ वर्षांनी मराठवाड्यात होणार कॅबिनेट बैठक

199
Cabinet meeting In Marathwada : तब्बल ७ वर्षांनी मराठवाड्यात होणार कॅबिनेट बैठक
Cabinet meeting In Marathwada : तब्बल ७ वर्षांनी मराठवाड्यात होणार कॅबिनेट बैठक

राज्याच्या मंत्रिमंडळाला सर्वाधिक मंत्री देणाऱ्या मराठवाड्यात तब्बल ७ वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक होऊ घातली आहे. (Cabinet Meeting In Marathwada) येत्या १६ सप्टेंबर रोजी ही बैठक होणार असून, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला आहे.

(हेही वाचा – Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकावरील गर्दीची कोंडी लवकरच फुटणार; काय होणार बदल ?)

याआधी सात वर्षांपूर्वी म्हणजेच ४ ऑक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आता १६ सप्टेंबरला बैठक घेण्याचे नियोजन आहे. या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या जिल्ह्यातील निर्णयांच्या अंमलबजावणीची स्थिती, जिल्हानिहाय राबवावयाच्या विकासयोजनांचे प्रस्ताव तयार करावे, लागणाऱ्या निधीबाबत माहिती द्यावी. जिल्ह्याचा आणि विभागाचा विकास होण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव तयार करून सादर करावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी सातही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. (Cabinet Meeting In Marathwada)

दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे या संदर्भातील तयारीचा आढावा घेतला.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा तो इतिहास पुन्हा नव्या पिढीला कळावा, त्याकाळी निजामाविरुद्ध दिलेल्या लढ्यातून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा करावा, विविध कार्यक्रमांचे नियोजन करुन आठही जिल्ह्यात ते आयोजित करावेत याबाबत मंत्री मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक उपस्थित होते. (Cabinet Meeting In Marathwada)

…हे कार्यक्रम होणार

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवानिमित्त मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात येणार आहे. याशिवाय मुक्तीसंग्रामाचा इतिहास, तेथील हुतात्म्यांचे स्मरण, स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव, आझादी दौड, प्रदर्शन, व्याख्यानमाला असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठही जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी व्हावा, मुक्तीसंग्रामातून मिळवलेल्या या स्वातंत्र्याचे मोल त्याला कळावे, यासाठी कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

मराठवाडा उपेक्षितच

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेतले जाते. मधली काही वर्षे त्याबाबत उदासिनता होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आग्रहपूर्वक अधिवेशन नागपुरात घेतले. प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मराठवाड्यात अधिवेशन होत नसले, तरी मंत्रिमंडळाच्या बैठका व्हाव्यात, असा संकेत आहे. मात्र, सर्वाधिक मंत्री देणारा मराठवाडा त्याबाबतीत उपेक्षित आहे. गेल्या १५ वर्षांत मराठवाड्यात केवळ दोनदा कॅबिनेट बैठक झाली आहे. २००८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. त्यानंतर २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये कॅबिनेट बैठक झाली होती. (Cabinet Meeting In Marathwada)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.