ऋजुता लुकतुके
दोन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेली रोमेनियन खेळाडू सिमोना हालेप उत्तेजक चाचणीच्या दोन प्रकरणांमध्ये दोषी आढळली आहे. (Simona Halep Banned) त्यामुळे तिच्यावर ऑक्टोबर २०२६ पर्यंत बंदी घालण्यात येत असल्याचं इंटरनॅशनल टेनिस इंटिग्रीटी असोसिएशनने स्पष्ट केलं आहे.
हालेपनं एकदा विम्बल्डन आणि एकदा फ्रेंच ओपन जिंकली आहे. पण, गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून ती तात्पुरती निलंबित आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेदरम्यान तिच्या लघवीच्या नमुन्यात रोक्झाडस्टाट हे बंदी असलेलं द्रव्य आढळलं होतं. पण, हालेपनं जाणतेपणी हे द्रव्य घेतल्याचं नाकारलं होतं. आताही तिने आपली भूमिका कायम ठेवली आहे. आणि या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचं म्हटलंय. (Simona Halep Banned)
(हेही वाचा – Epidemics Increased : गणेशोत्सवाच्या तोंडावर साथीचे आजार वाढले, पालिकेकडून तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन)
आज टेनिस इंटिग्रिटी असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हालेपविरुद्ध पुरावे असल्याचं म्हटलंय. ‘हालेपच्या मूत्र तपासणीत रोक्झाडस्टाट या द्रव्याचं प्रमाण जास्त होतं. त्याची मात्रा दुर्लक्ष करण्यासारखी नव्हती,’ असं या पत्रकात नमूद करण्यात आलंय.
सिमोना हालेपनं अजाणतेपणी एका औषधातून हे द्रव्य पोटात गेल्याचं म्हटलंय. ‘अशक्तपणा दूर करण्यासाठी रक्तातील लोहाचं प्रमाण वाढवणारं औषध आपण घेतलं. त्यातून रोक्झाडस्टाट हे मूलद्रव्य शरीरात गेलं. पण, औषध घेताना आपल्याला तशी कल्पना नव्हती. जे औषध घेतलं, ते आपण पुरावा म्हणून सादर केलेलं आहे,’ असा हालेपचा दावा आहे. (Simona Halep Banned)
तिने घेतलेल्या औषधात भेसळ होती असाही तिचा दावा होता. सुरुवातीला तिचा दावा इंटिग्रिटी असोसिएशनच्या विशेष कोर्टाने चर्चेसाठी मान्यही केला होता. पण, आता बंदी असलेल्या द्रव्याचं प्रमाण लक्षात घेऊन त्यांनी बंदीच्या कारवाईला अनुमोदन दिलं आहे.
हालेप विरोधातील दुसरं प्रकरण तिच्या बायोलॉजिकल पासपोर्टविषयीचं आहे. तिच्या शरीरात उत्तेजक द्रव्य सेवनामुळे होतात असे बदल आढळून आले आहेत. त्यामुळे विशेष कोर्टाने हे प्रकरण उत्तेजक सेवनाकडे झुकत असल्याचं मत व्यक्त केलं. त्यानंतर दोन्ही प्रकरणं मिळून हालेपवर ४ वर्षांची बंदी धालण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाविरोधात हालेप अपील करणार आहे.
ऑक्टोबर २०१७ मध्ये हालेप आपल्या सर्वोत्तम म्हणजे अव्वल रँकिंगपर्यंत पोहोचली होती. महिलांच्या क्रमवारीत ती सलग दोन वर्षं अव्वल स्थानावर होती. सेरेना विल्यम्स तेव्हा मातृत्वाच्या रजेवर होती. तिची जागा हालेपच घेऊ शकते अशी चर्चा तिच्याबद्दल होती. २०१८ मध्ये आधी फ्रेंच आणि २०१९ विम्बल्डन जिंकून तिने सुरुवातही चांगली केली होती. पण, २०२० नंतर दुखापतींनी तिचा पिच्छा पुरवला. पहिल्यांदाच ती दहातून बाहेर फेकली गेली.
२०२२ मध्येही तिने दोन विजेतेपदं मिळवली होती. पण, ऑक्टोबर महिन्यापासून तिच्यावर उत्तेजक चाचणी नियम भंगाचे आरोप झाले. तेव्हापासून ती निलंबित आहे. (Simona Halep Banned)
हेही पहा –