मुंबई : देशातील सर्वात बलशाली मानल्या जाणाऱ्या ‘एनडीए’ आघाडीचा घटकपक्ष राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून, या कारवाईमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले असून, दोन्ही गटांचे सोशल मीडियावरील अकाऊंट वेगवेगळे आहेत. यातील अजित पवार गटाच्या अकाऊंटवर ट्विटर म्हणजेच एक्सकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या अकाऊंटवर कोणतीही पोस्ट दिसत नाही.
नियम न पाळल्याने हे अकाउंट सस्पेंड करण्यात आल्याचे ट्विटरकडून (एक्स) सांगण्यात आले आहे. तसा मेसेजदेखील अजित पवार गटाच्या ट्विटर अकाऊंटवर दिसत आहे. मात्र, नेमक्या कोणत्या नियमांचे उल्लघंन केल्याने ही कारवाई केली, याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
ट्विटरकडून कारवाई कधी होते?
– ट्विटरच्या नियमावलीनुसार एखादा वापरकर्ता त्याच्या अकाउंटवरून वारंवार आक्षेपार्ह, द्वेष निर्माण करणारे, अश्लीलता पसरवणारे, कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करणारे किंवा या कोणत्याही संदर्भात ट्विटरच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या अकाऊंटवर कारवाई केली जाते.
– नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ट्विटर वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करू शकते. एखादे ट्वीट आक्षेपार्ह असेल, तर त्या ट्विटला ‘Disputed’ किंवा ‘Misleading’ असे लेबल लावले जाते. किंवा विशिष्ट प्रदेशात किंवा देशात हे ट्विट युजर्सला दाखवले जात नाही.
– ट्वीट अगदीच गंभीर असेल, तर युजरला ते काढून टाकावे लागते. त्यासंदर्भात ट्विटरकडून युजरला ई-मेलद्वारे माहिती दिली जाते. जोपर्यंत संबंधित ट्विट युजर काढत नाही, तोपर्यंत ते इतर युजर्ससाठी हाईड म्हणजेच लपवले जाते.