का वाढतोय राज्यात कोरोना? राज ठाकरेंनी सांगितले कारण!

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लावले, त्याआधी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. 

146

परराज्यातून येणारे नागरिक आणि त्यांची कोरोना चाचणी न होणे, यामुळे राज्यात कोरोना वाढला आहे. इतर राज्यात कोरोना चाचणी केली जात नाही. म्हणून त्या राज्यात किती रुग्ण आहेत, त्याचे आकडे समोर येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात. राज्यात येणाऱ्या परराज्यातील नागरिकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी, अशी सूचना मी यापूर्वीच केली होती. परंतु, त्याकडे लक्ष दिले नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी करत नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कोण येते, कोण जाते, हे कुणालाच माहीत नसते. आज कोरोना आहे, उद्या आणखी काही येईल, हे दुष्टचक्र न थांबणारे आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काय केल्या राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सूचना?

  • जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितले, पण विक्रीला बंदी आहे. असे असेल तर उत्पादन करुन ठेवायचे कुठे? विकायचे नाही, तर उत्पादन का करायचे?, म्हणून छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून २-३ दिवस दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्या.
  • अनेकांनी छोटी-मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य आहे, पण लोकांकडे पैसा असेल, तर बँकेत जाईल. सक्तीने वसूल केली जात आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे? सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करावे.
  • जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना सूट द्या, राज्याने केंद्राशी बोलावे.
  • लॉकडाऊनमध्ये सरकारी कंत्राटी कामगारांना घेतले होते, पण नंतर काढून टाकले. मी सूचना केली, त्यांना परत घ्या, तहान लागली की विहीर खोदणे योग्य नाही़.
  • जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी.
  • स्वीमिंग पूल बंद ठिक आहे. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी.
  • शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. शेतकरी जर कोसळला तर पुन्हा अजून मोठे संकट येईल.
  • शाळा बंद आहेत, पण शाळांचे शैक्षणिक शुल्क कायम आहे, ती माफ करावी.
  • दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, परीक्षा न घेता पास करा. ती मुलेही तणावात आहेत. कुठून अभ्यास करणार, कशा परीक्षा देणार?

(हेही वाचा : लसीकरण वाढवण्यासाठी आता नगरसेवकांचाही हातभार!)

खासगी रुग्णालयांना समज द्या!

अर्थव्यवस्था कोसळली आहेच, पण समाजमनही कोसळले आहे. आज रुग्णांना बेड मिळत नाहीत. बेड असून दिले जात नाहीत. हॉस्पिटलकडे बडे असून जर दिले जात नसतील, तर ती असून उपयोगाचे काय? हे सर्व महापालिकांची यंत्रणा वापरतात, राज्यावर संकट येते तेव्हा मदत करत नाहीत. ठाण्यात ग्लोबल हॉस्पिटलमध्ये १ हजार बेड आहेत, मात्र दिले जात नाहीत. आमदार-नगरसेवक फोन करतात, त्यांना द्यावे लागतात, असे ते कारण देतात. ते बेड सामान्य माणसांना मिळणार नाही का? या हॉस्पिटलला सामाजिक जाणीवा नसतील तर ती करुन दिली पाहिजे. आमच्या जाणीवा करुन देण्याची पद्धती वेगळ्या आहेत, असे देखील राज ठाकरे म्हणाले. लसीकरण वाढवायला हवे, त्याला वयाचे बंधन नको, त्यातील टेक्नीकल बाबी मला माहिती नाहीत, पण वयाचे बंधन नको, असेही राज ठाकरे म्हणाले.

 अनिल देशमुख महत्त्वाचा विषय नाही!

माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. विषय होता मुकेश अंबानींच्या घराखाली पोलिसाने बॉम्बची गाडी ठेवली, त्याची चौकशी होणार आहे का? बॉम्बची गाडी पोलिसांनी ठेवली, ती कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली? पोलीस कुणीतरी सांगितल्याशिवाय असे कृत्य करणार नाही. यात अनिल देशमुखांची चौकशी होईलच, पण ही गाडी कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी. विषयाला फाटा नको. मूळ विषय भरकटत जातो, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.