ऋजुता लुकतुके
रिलायन्सच्या जिओ सिनेमा या ओटीटी ॲपवर आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका पाहता येणार आहे. ही मालिका मोफत दाखवणार असल्याचं रिलायन्स कंपनीने स्पष्ट केलं आहे. हे सामने ११ भारतीय भाषांमध्ये दाखवण्यात येणार असून त्यासाठी आकाश चोप्रा, केदार जाधव, सुरेश रैना, अमित मिश्रा, हनुमा विहारी, किरण मोरे, अनिरुद्ध श्रीकांत आणि शरणदीप सिंग या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा ताफा कंपनीने समालोचन कक्षात आणला आहे.
रिलायन्सची उपकंपनी व्हायकॉम १८ ने सप्टेंबर २०२३ ते मार्च २०१८ पर्यंतच्या भारतात होणाऱ्या सामन्यांचे डिजिटल तसंच टीव्ही प्रसारणाचे हक्क बीसीसीआयकडून मिळवले आहेत. आणि या प्रसारणासाठी कंपनी प्रत्येक सामन्यामागे सुमारे ६५ कोटी रुपये बीसीसीआयला देणार आहे.
प्रेक्षकांसाठी मात्र अजूनही कंपनीने हे सामने मोफत देऊ केले आहेत. भारतीय प्रेक्षकांचा सामना पाहण्याचा अनुभव बदलून टाकू असा विश्वास वायकॉम १८ कंपनीने व्यक्त केला आहे. डिजिटल माध्यमाबरोबरच वायकॉमच्या सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरही या मालिकेचं प्रसारण होणार आहे. सामन्यांमध्ये प्रेक्षकांचा सहभाग असावा यासाठी जितो धन दनादन अशी एक स्पर्धाही होणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील तीन सामने अनुक्रमे २२, २४ आणि २७ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय वातावरण जुळवून घेण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन संघानेच या मालिकेचा प्रस्ताव भारतीय क्रिकेट मंडळासमोर ठेवला होता. इंग्रजी व हिंदी भाषेव्यतिरिक्त मराठी, भोजपुरी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा, पंजाबी आणि बंगाली भाषांमध्ये हे प्रसारण होणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community