मुंबई महापलिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने माघार घेतल्याने, शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. शिक्षण समिती आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानंतर, मंगळवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीतही काँग्रेसचे अश्रफ आजमी यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेना उमेदवार सदा परब यांचा बहुमताने विजय झाला आणि त्यांनी सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून येत हॅट्रीक साधली आहे.
अश्रफ आजमींची माघार
यापूर्वी सुधार समिती अध्यक्षपदी सलग तीन वेळा निवडून येण्याचा मान शिवसेना नगरसेवक शैलैश फणसे यांच्या नावावर होता. त्यामुळे परब यांनी तिसऱ्यांदा निवडून येत फणसे यांच्या विक्रमासोबत बरोबरी साधली आहे. सुधार समितीच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सदा परब यांना पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. तर काँग्रेसच्यावतीने अश्रफ आजमी आणि भाजपच्यावतीने स्वप्ना म्हात्रे हे निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी पिठासीन अधिकारी म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत, अर्ज मागे घेण्याच्या १५ मिनिटांच्या कालावधीत काँग्रेसचे अश्रफ आजमी यांनी आपला अर्ज मागे घेतला.
(हेही वाचाः शिक्षण समिती अध्यक्षपदी सेनेच्या संध्या दोशी!)
सदा परब यांना सर्वाधिक मते
आजमी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे परब आणि म्हात्रे यांच्यात थेट लढत होती. पण काँग्रेसने घेतलेली माघार आणि त्यातही त्यांनी तटस्थ राहण्याची घेतलेली भूमिका तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या दोन्ही सदस्यांनी शिवसेनेचे सदा परब यांच्या बाजूने कौल दिला. परब यांना १३ मते मिळाली, तर म्हात्रे यांना १० मते मिळाली.एकूण २६ सदस्यांपैकी २३ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. तर तीन जण तटस्थ राहिले. त्यामुळे पिठासीन अधिकारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी अधिक मते मिळवणाऱ्या सदा परब यांना विजयी घोषित केले.
Join Our WhatsApp Community