मुंबई महापालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्तपदी असलेल्या श्रावण हर्डीकर यांची बदली होऊन दीड महिन्याचा अर्थात ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर अखेर या पदाला अधिकारी लाभला असून महापालिकेत यापूर्वी अतिरिक्त आयुक्तपदाची कमान सक्षमपणे पार पाडणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी यांची नियुक्ती या पदावर झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्त म्हणून महापालिकेची सुत्रे हाती घेत जोशी यांनी जोरदार कमबॅक केले आहे.
श्रावण हर्डीकर यांची महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (महा मेट्रो) व्यवस्थापकीय संचालकपदी २७ जुलै २०२३ रोजी बदली झाल्यानंतर तेव्हापासून महापालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्तांचे पद रिक्त होते. त्यामुळे महापालिकेत या रिक्तपदी कोणाची वर्णी लागणार आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु तब्बल दीड महिन्यानंतर या पदाला वारस लाभला असून सन २०१८-१९ या कालावधीत अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार सांभाळणाऱ्या अश्विनी जोशी यांची पुन्हा महापालिकेत याच पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अश्विनी जोशी या सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवपदी होत्या, त्यांची वर्णी महापालिका अतिरिक्तपदी लावल्यानंतर त्यांच्य जागी गृहविभागाचे प्रधान सचिव डी.टी. वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जोशी यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने एक प्रकारचे समाधान महापालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्याकडून व्यक्त केले जात आहे.
(हेही वाचा MHADA : म्हाडा कोंकण मंडळ : आणखी ५३११ सदनिकांच्या विक्रीची लॉटरी)
मुंबई महापालिकेत (BMC) यापूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या डॉ. अश्विनी जोशी आरोग्य, सुरक्षा, मुंबई अग्निशमन दल, आपत्कालीन नियंत्रण कक्ष आदींची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु आरोग्य विभागाची जबाबदारी पार पाडताना जोशी यांनी आजवर ज्या कामचुकार व फसवणूक करणाऱ्या औषध वितरक कंपन्यांना प्रशासन पाठिशी घालत होते, त्या कंपन्यांवर कारवाई करत त्यांना धडा शिकवला होता. प्रशासन औषध वितरकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्या कृत्यावर डोळेझाक करण्याचे काम करायचे. पण त्यांच्यावर कारवाई करत जोशी यांनी आपल्या आक्रमकतेची पोच पावती दिली होती. कोविड १९च्या रुग्णांसाठी क्वारंटाईन तथा आयसोलेशन म्हणून वापरात असणारे सेव्हन हिल्स रुग्णालय हे जोशी यांच्या प्रयत्नांमुळेच ताब्यात आले आहे. विधी खात्याच्या अधिकाऱ्यांना योग्यप्रकारे विश्वासात घेत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडून ते महापालिकेच्या (BMC) ताब्यात मिळवले होते. त्यामुळेच आज सेव्हन हिल्सचा वापर महापालिका करू शकले. शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या कंत्राटातील गैरकारभार लक्षात येताच जोशी यांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. तिथेच खऱ्या अर्थाने परदेशी आणि जोशी यांच्या ठिणगी उडाली. पुढे जोशी यांच्या स्वाक्षरीशिवाय स्थायी समितीपुढे प्रस्ताव आणून मंजुर करून घेतला होता. पण पुढे हाच प्रस्ताव प्रशासनाला काही कारणास्तव मागे घेण्याची नामुष्की आली होती. अश्विनी जोशी या आरोग्य विभागाला योग्यप्रकारे दिशा देण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांची बदली ठाकरे सरकार राज्यात आल्यानंतर सूडबुध्दीने करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community