महाराष्ट्रात एकूण दहा भाषेत शिक्षण दिले जाते. तरीदेखील काही मुलांमध्ये इंग्रजीविषयी भीती असते. जर मुलांना जगभरात जाऊन नाव कमवायचे असेल, रोजगार मिळवायचा असेल तर त्यांनी इंग्रजीसह परकीय भाषांवर देखील प्रभूत्व मिळविणे ही काळाची गरज आहे. मातृभाषेसह अशा इतर भाषांमध्ये विद्यार्थ्यांना पारंगत करणे, यासाठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. मुलांना ज्ञानासह ‘टेक्नोसॅव्ही’ करा. असे केल्याने आपल्या विद्यार्थ्यांना जगाची कवाडे खुली होतील, अशी भावना राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
मुंबई महानगरपालिका शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या ५० शिक्षकांना महानगरपालिकेकडून दरवर्षी ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ प्रदान केले जातात. यंदा या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या ५० शिक्षकांना गुरुवारी १४ सप्टेंबर २०२३ समारंभपूर्वक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. भायखळा येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आण्णा भाऊ साठे नाट्यगृहात पार पडलेल्या या समारंभास महानगरपालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) गंगाथरण डी., शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. शिक्षकांमध्ये समाज घडविण्याची, समाजाची मानसिकता बदलण्याची ताकद असते. आपल्या मुंबई महानगराला आणखी सुंदर, स्वच्छ ठेवायचे असेल तर त्यासाठी शिक्षकांनी पुढे यावे आणि विद्यार्थ्यांमध्ये मुंबईच्या स्वच्छतेविषयी आस्था निर्माण करावी, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
केसरकर म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे नूतनीकरण, दुरुस्ती आदी कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत. शाळांमधून विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार शिक्षण व चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याबद्दल महानगरपालिकेचा शिक्षण विभाग तसेच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांचे देखील अभिनंदन करतो,असे त्यांनी स्पष्ट केले. विविध कंपन्यांकडे सामाजिक दायित्व (सीएसआर) निधी असतो. हा निधी आरोग्य, शिक्षण घटकांवर या कंपन्या खर्च करीत असतात. अशा कंपन्यांनी नूतनीकरण व दुरुस्तीसाठी शाळा दत्तक घ्याव्यात आणि मुलांसाठी तेथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहनही केसरकर यांनी केले.
यापूर्वी शिक्षण सेवकांना कमी मानधन मिळत होते. आता त्यांना १६, १८ आणि २० हजार असे मानधन देण्यात येते. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पाच ते साडे सात हजारांपर्यंत वाढविण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, मोजे आदी मोफत देण्यात येत आहेत. मातृभाषेसह अशा इतर भाषांमध्ये विद्यार्थ्यांना पारंगत करणे, यासाठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. मुलांना ज्ञानासह ‘टेक्नोसॅव्ही’ करा. असे केल्याने आपल्या विद्यार्थ्यांना जगाची कवाडे खुली होतील. विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व गुणांना वाव मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी विशेष भर द्यायला हवा. यासाठी मुलांचे वाचन वाढणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून ‘रिड महाराष्ट्र’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे प्रत्येक शाळेत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. ‘स्वच्छता मॉनिटर’ या उपक्रमातही ६५ हजार शाळा सहभागी झाल्या आहेत. हा उपक्रम लवकरच प्रत्येक शाळेत सुरू करण्यात येणार आहे, असेही केसरकर म्हणाले.
(हेही वाचा – Govinda : अभिनेता गोविंदावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप; आर्थिक गुन्हे शाखा करणार चौकशी)
सह आयुक्त (शिक्षण) गंगाथरण डी. म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची दहावी निकालाची टक्केवारी सध्या ८५ टक्के आहे. यापुढे ही टक्केवारी ९५ पर्यंत जायला हवी, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांमधील व्यासपीठाची भीती घालविण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्यातील वक्तृत्व गुणांना वाव मिळवून देण्यासाठी शिक्षकांनी विशेष भर द्यायला हवा. तसेच जे विद्यार्थी अभ्यासात मागे असतील, अशांना गुणवंत विद्यार्थ्यांच्या शेजारी बसवून त्यांचा प्रत्येक आठवड्यात आढावा घ्यावा, असे गंगाथरण यांनी नमूद केले. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी प्रास्ताविक केले. शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन किसन पावडे यांनी केले.
आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांविषयीः यंदा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारांचे ५३ वे वर्ष होते. मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विना अनुदानित प्राथमिक शाळांतील ५० शिक्षकांना प्रत्येकी रुपये ११ हजार (ECS द्वारे), बृहन्मुंबई महानगरपालिका मानचिन्हाचे सोन्याचा मुलामा दिलेले पदक, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व फेटा प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. सन-२०२२-२३ च्या पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांची निवड करण्यासाठी महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित शाळा व विनाअनुदानित शाळांतील एकूण १४७ शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून ५० आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली. पुरस्कारार्थींमध्ये २९ महिला शिक्षकांसह २१ पुरुष शिक्षकांचा समावेश आहे. तसेच यामध्ये मराठी माध्यमाचे १६, इंग्रजी माध्यम ११, तसेच हिंदी व उर्दू माध्यमाच्या प्रत्येकी ७ शिक्षकांचा समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community