कोरोनाने मुंबई महाराष्ट्रात शिरकाव करून बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. तेव्हापासून ठाण मांडून बसलेला हा आजार काही केल्या इथून हटण्याचे नाव घेत नाही. मध्यंतरी हा आजार आता गेलाय असे वाटत होते. पण कसलं काय. पुन्हा आता नव्याने कोरोना अवतरला आणि सर्वांनाच घाबरुन टाकू लागला. मागील मार्च-एप्रिलमध्ये जेव्हा त्याने हातपाय पसरवायला सुरुवात केली आणि पुढे पुढे जेव्हा या आजाराने रौद्ररुप धारण केलं, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाला घाबरुन चालणार नाही. तर त्याला अंगावर झेलत पुढे जावं लागेल, असे आवाहन केलं होतं. आज मुंबईसह राज्यात ज्याप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतेय ते पाहता खरोखरच पोटा पाण्यासाठी घराबाहेर पडणारी जनता या आजाराला अंगावर झेलत चालली, असं वाटू लागलंय. पण हा आजार अंगावर झेलताना सुरक्षा कवचाचा वापर करण्याचा विसर त्यांना पडलाय. किंबहुना बिनधास्तपणामुळे त्यांनी याचा अवलंब करण्यास नकार दिला असावा. मी तर म्हणेन हा बिनधास्तपणा नाही, निडरपणा नाही, तर ही बेफिकीरी आहे. अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, कोरोना आहे कुठे? कोरोनाबिरोना काही नाही? कोरोना आता आमचं काय वाकडं करणार आहे? जेव्हा कोरोनाचे संकट जोरात होतं, तेव्हा आम्ही काम करत होतो. तेव्हा आम्हाला झाला नाही. तर आता कुठून होणार? असे म्हणणारे महाभाग आहेत. त्यातच ज्यांना कोरोना झालाय, तेही मग आम्हाला होवून गेलाय. आम्ही मास्क लावला काय आणि नाही लावला तरी काय? आम्ही लस घेतली? आमचे दोन डोस पूर्ण झालेत. आम्हाला आता कोरोना होणार नाही? असं सांगत जे निष्काळजीपणे फिरत होते. समाजात वावरत होते. त्यांनाही आता पुन्हा कोरोनाने घेरलंय. जखडलंय. बिनधास्तपणे वागताना त्यांना बेजबाबदार आणि निष्काळजीपणा यांनाही ते सोबत घेवून फिरु लागल्याने कोरोनाने पुन्हा एकदा त्यांना येवून घट्ट मिठी मारली.
कोरोनाचे खापर सरकार, महापालिकेवर फोडू नका!
देशासह जगात कोरोनाची कमी-अधिक प्रमाणात लाट आहे. पण या आजाराचा जर सामना करायचा असेल तर स्वत:ची काळजी स्वत:च घेणं आवश्यक आहे. आपण दुसऱ्यावर निर्भर राहणं हे योग्य ठरणार नाही. पण मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग ज्यापध्दतीने होतोय, याला लोकांची बेफिकीरीच जबाबदार आहे, असंच मी म्हणेन. जी काळजी मुंबईकरांसह राज्यातील जनता २२ मार्च २०२० रोजी झालेल्या लॉकडाऊननंतर घेत होते. ती काळजी आता आपण घेतोय का, हे प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारावं आणि कोरेानाचा आजार का वाढतोय याचं आत्मचिंतन करावं. वाढत्या कोरोनाच्या आजाराला आज आपण उठसूट सरकार किंवा महापालिकेला जबाबदार धरत आहोत. पण वाढत्या कोरोनाच्या आजाराला हे जबाबदार कसे? मी तर इथे जबाबदारीने सांगेन की, जर आज कोरोना वाढत असेल तर आपणच याला जबाबदार आहे. मग आपल्या निष्काळजीपणाचे खापर सरकार किंवा महापालिकेवर का फोडायचं? या आजाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी ही सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिका, नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी यांची आहे. ती ते चोख पार पाडत आहे. पण नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी चोख पार पाडत आहोत का? केवळ आपल्या आणि आपल्याच निष्काळजीपणामुळे मार्च २०२१ या महिन्यात ८८ हजार रुग्ण वाढले. मृत्यू दर कमी झालेला असतानाही महिन्यात २१२ रुग्णांचा मृत्यू झालाय. अगदी वर्षभराच्या रुग्ण संख्येचा आढावा घ्यायचा झाल्यास आजवरची सर्वात मोठी ही रुग्ण संख्या आहे. आजवर सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे ५७ हजार ३३७ एवढी रुग्ण संख्या झाली होती. म्हणजे जेव्हा हा आजार ऐन भरात होता, तेव्हाही जेवढी रुग्ण संख्या नव्हती, तेवढी रुग्ण संख्या ही कोरेाना माघारी फिरतोय असं वाटत असतानाच मार्च महिन्यात झालीय. म्हणजे कोरोना वेगाने उलट फिरतोय, असंच म्हणावं लागेल. कोरोनाचा दुसरा टप्पा असल्याचं बोललं जात असलं तरी एवढी रुग्णसंख्या का वाढली हा टास्क फोर्सच्या संशोधनाचा विषय आहे.
खासगी रुग्णालयांसोबत महापालिकेवरही विश्वास ठेवा!
दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाच्या विषाणूबाबत काही भीतीदायक चि़त्र रंगवलं जातंय. पण काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा विषाणू तेवढा भीतीदायक नाही. हा वेगाने पसरणारा आहे. याचा संसर्ग अतिवेगाने होतो. पण याची बाधा झाल्यामुळे रुग्णाला त्वरीत रुग्णालयात दाखल करावं लागेल किंवा त्याचा मृत्यू ओढावेल इथपर्यंत तो धोकादायक नाही. त्यामुळेच कदाचित मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हे दहा हजार रुग्ण होईपर्यंत निश्चिंत आहेत. वाढत्या चाचण्यांची संख्या पाहता ही संख्या दहा हजारांच्या घरात जाईल, अशी शक्यता त्यांनी यापूर्वीच वर्तवली आहे. तसे झाल्यास रुग्णशय्येसह सर्व यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु ज्या झपाट्याने हा आजार वाढतोय, ते पाहता जर रुग्णशय्येसह इतर यंत्रणा कमी पडू लागली तर काय करणार? महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्त तसेच उपायुक्तांना ४८ तासांमध्ये अशाप्रकारची यंत्रणा सुरु करता येईल, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांनी याची तयारीही केली आहे. यापूर्वीचा अनुभव घेता आपल्याला महापालिकेच्या यंत्रणावर विश्वास ठेवावाच लागेल. आज काही प्रमाणात पुन्हा एकदा खाटांची मागणी वाढू लागलीय. पण पैसेवाल्यांचा कल हा खासगी रुग्णालयांकडे आहे. पण हा कल खासगी रुग्णालयांकडे असणे तेवढंच आवश्यक आहे. तरच गरीबांनाही महापालिकेच्या कोविड काळजी केंद्रात जागा उपलब्ध करून देत त्यांच्यावर उपचार करता येतील. जेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा मुंबई महापालिकेने जो हा आजार नियंत्रणात आणला होता, तर मग या वाढत्या आजारावरही ते नियंत्रण मिळू शकतात. माझा मुंबई महापालिकेवर पूर्ण विश्वास आहे आणि मुंबईतील प्रत्येक जनतेने आज महापालिकेवर विश्वास ठेवायलाच हवा. नव्हेतर महापालिकेच्या पाठिशी खंबीर उभं राहायला हवं. उभं राहायला हवं म्हणजे तर महापालिकेला पूर्ण सहकार्य करायला हवंय.
(हेही वाचा : महापालिका मुख्यालयासह कार्यालयांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी!)
कोरोनाला बेजबाबदार नागरिकच जबाबदार!
या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची संख्या ज्याप्रकारे वाढतेय, ते पाहता लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय. त्यामुळे पुन्हा लोकांना घरी बसवून या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन केलं जाणार का? आणि करणार असतील तर केव्हापासून होणार? मग आमच्या पोटापाण्याचं काय? नोकरीचं काय? कामाधंद्याला कसं जायचं अशा अनेक प्रश्नांनी जनता त्रस्त झालीय. पण लॉकडाऊन करायची राज्याचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची मानसिकता आहे का? महापालिकेचे आयुक्त म्हणून इक्बालसिंह चहल यांनी तयारी आहे का? या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच मिळतील. समाजातील एक घटक जो घरी बसूनही काम करू शकतो, त्याला लॉकडाऊन हवाय. पण ज्याचं हातावर पोट आहे, त्याला लॉकडाऊन नको. पण जर लॉकडाऊन नको. कडक निर्बंध नको. तर मग आपण स्वत: यासाठी काय प्रयत्न करतोय. एक अनुभव मुद्दाम इथं सांगेन. जेव्हापासून सर्वसामान्य जनतेला रेल्वे लोकल प्रवास खुला झालाय. तेव्हापासून मी स्वत: लोकल डब्यात असो वा रस्त्यावरुन चालताना ज्याचं मास्क नाकावर आलेलं असेल. हनुवटीवर अडकवलेलं असेल. त्यांना हटकून ते मास्क योग्यप्रकारे लावण्यास भाग पडतोय. सामान्य माणूस असलो तरी जबाबदारी नागरीक म्हणून मी लोकांमध्ये जनजागृती करत होतो. परंतु दरदिवशी रुग्णसंख्या वाढत होती, तसा नागरिकांमधील निष्काळजीपणा अधिकच वाढू लागलाय. विनामास्कच्या नागरिकांना एकाबाजुला ५०० रुपयांचा दंड आकारला जात असतानाही मी त्यांना हटकून किमान मास्क सरळ करा, असेच आवाहन करायचो. पण अशाप्रकारे हटकल्यानंतर, तुझं काय जातंय? कुठे आहे कोरोना? हे सगळं नाटक आहे, त्या लॅब आणि खासगी वाल्यांना धंदा देण्यासाठी हे सुरु आहे, अशी करणे देत. आपण हटकल्यांनतर काही क्षण मास्क नाकावर घ्यायचं आणि पुन्हा मास्क नाकाखाली आणायचं. त्यामुळे अशा निष्काळजी नागरीकांमध्ये मी अशाप्रकारे लोकांना हटकणे बंद करून टाकलं. माझ्याप्रमाणे अशाप्रकारे अनेक जबाबदार नागरीक आहे. ते लोकांना सांगून कंटाळले. सांगण्याचं तात्पर्य हेच की काही सडक्या डोक्याच्या लोकांमुळे ही सिस्टीम बदलत चालली आहे. त्यांना बदलण्यासाठी कडक कारवाईच करायला हवी. आंब्याच्या पेटीत जसा एक सडका आंबा संपूर्ण पेटीतील आंबे सडवून टाकतो, तसेच ही बेशिस्त माणसे आहेत. जी स्वत: कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत नाही आणि त्यांचे बघून इतरही त्याचे पालन करत नाही. त्यामुळे चांगल्या माणसांनाही अशा्प्रकारची माणसे बिघडवत चालली आहेत. त्यामुळे कारवाईचा बडगा या लोकांपासून सुरु व्हायला हवा.
लसीबाबत गैरसमज करून घेऊ नका!
लॉकडाऊन हा कोरोनावर उपाय ठरु शकत नाही. आधी कडक निर्बंध लागू करायला हवेत. एका बाजुला निर्बंध किंवा लॉकडाऊनच्या निर्णयापर्यंत मुख्यमंत्री किंवा आयुक्त पोहोचलेले नसताना मुंबईचे महापौर हे प्रसिध्दीच्या हव्यासापोटी वायफळ बडबड करत समाजात एकप्रकारची भीती पसरवत आहे. त्यामुळे पहिली ताळेबंदी जरी करायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी महापौरांच्या तोंडाला करावी. तसेच भविष्यात याबाबतचे निर्बंध लादताना सर्वसामान्यांच्या रोजीरोटीवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यासाठी सर्वप्रथम सर्वसामान्य जनतेला रेल्वे लोकलप्रवास खुला करताना ज्या ठराविक वेळेतच प्रवास करण्याची मुभा दिली आहे, त्या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हायला हवं. रेल्वे लोकल अत्यावश्यक सेवांसाठीच सुरु करून इतरांना बंद करण्याऐवजी आधी या आदेशाचे पालन व्हायला हवं. पण सरकारचं झालंय असं की जखम पायाला अन् मलमपट्टी डोक्याला. आज कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरच लोकांमध्ये अधिक बेफिकीरी वाढू लागलीय. आपण दोन डोस घेतले, त्यामुळे आपल्याला कोरोना होणार नाही, असाच गोड गैरसमज लोकांचा झालाय? पण ही बेफिकीच वाढत्या रुग्णसंख्येला कारणीभूत ठरु लागली आहे. खरं तर दोन डोस घेतलेल्यांना रुग्णालयात दाखल करायची गरज भासणार नाही, असे सर्वसामान्य समज असला तरी असे दोन डोस घेणाऱ्यांनाच रुग्णालयात दाखल करावं लागतं. त्यामुळे लसींचा फायदा काय? दुसरीकडे या लसीकरणानंतरच लोकांना कोरेानाची बाधा होऊ लागली. यासर्व पार्श्वभूमीवर एकच गोष्ट लोकांना आवर्जुन सांगायची गरज आहे ती म्हणजे लस असो किंवा काहीही. पण मास्क लावणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हेच आपल्या सर्वांचे सुरक्षा कवच आहे. या सुरक्षा कवचाचा दैनंदिन वापर आपण कोरोनापासून बचाव करू शकतो. महापालिका किंवा सरकार यांच्यावर निर्भर राहण्यापेक्षा स्वत:च यापासून बचाव करण्यासाठी आपण आत्मनिर्भर होण्याची गरज आहे.
Join Our WhatsApp Community