-
ऋजुता लुकतुके
आशिया चषकात भारतीय संघाने आधीच अंतिम फेरी गाठली असली तरी सुपर फोरची बांगलादेश विरुद्धची लढत संघासाठी कमी महत्त्वाची नाही. एकदिवसीय विश्वचषकासाठीची संघ उभारणी म्हणून या स्पर्धेकडे भारत बघतोय आणि त्या दृष्टीने श्रेयस अय्यरचं परतणं महत्त्वाचं आहे. भारतीय संघाची सुपर ४ मधील शेवटची लढत शुक्रवारी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. आणि या सामन्यापूर्वी गुरुवारी भारतीय संघाने सराव केला तेव्हा सगळ्यांचं लक्ष होतं श्रेयस अय्यरवर. सक्तीच्या नसलेल्या या सराव सत्रात तो सहभागी होतो का, यावरून ठरणार होतं त्याचं पाठदुखी किती बरी झालीय?
तो हॉटेलमधून प्रेमदासा स्टेडिअमवर सरावासाठी आला. आणि त्याने फलंदाजीचा सरावही केला. श्रेयस आशिया चषकातील भारताचे साखळी सामने खेळला होता. पाकिस्तान विरुद्ध त्याने १४ धावाही केल्या. पण, त्यानंतर त्याची पाठ पुन्हा दुखावली आणि पुढच्या सुपर ४च्या दोन्ही लढतीत तो खेळला नाही. पण, त्याच्या अनुपस्थितीत के एल राहुलने पाकिस्तान आणि श्रीलंका अशा दोन्ही सामन्यांत चमक दाखवली. पाकिस्तान विरुद्धची शतकी खेळी आणि लंकेविरुद्ध बहुमोल ३९ धावा करत त्याने आपण पूर्णपणे तंदुरुस्त झालो असल्याची चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळे भारतीय संघात आता फलंदाजीचा क्रमही जवळपास निश्चित झाला आहे.
(हेही वाचा – I.N.D.I.A आघाडी 14 टीव्ही अँकर्सच्या कार्यक्रमावर टाकणार बहिष्कार)
श्रेयसने गुरुवारी फलंदाजीचा हलका सराव केला. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ३ ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. फिरकी गोलंदाजांना खेळण्याची हातोटी, एकेरी-दुहेरी धावा चोरून धावफलक हलता ठेवण्याचं कौशल्य आणि कामगिरीतील सातत्य यामुळे श्रेयस अय्यर मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताला त्याची गरज आहे. आणि तो हळू हळू सामना खेळण्यासाठीची तंदुरुस्ती पुन्हा कमावत असल्याचं दिसतंय. भारतीय संघाने अंतिम फेरीत यापूर्वीच मजल मारली आहे. बांगलादेश विरुद्धचा सामना औपचारिक आहे. पण, फलंदाजी आणि गोलंदाजीचा क्रम ठरवण्यासाठी हे सामने भारतासाठी महत्त्वाचे आहेत. श्रीलंकेविरुद्ध भारतीय फलंदाजांनी केलेल्या चुका आणि सर्व गडी बाद होण्याची आलेली नामुष्की संघाला टाळायला हवी आहे. जबाबदार फलंदाजीची अपेक्षा मधल्या फळीकडून आहे.
तर भारतीय वातावरणात किती फिरकी गोलंदाज खेळवायचे, तीन तेज गोलंदाजांमध्ये महम्मद शामीची भूमिका नेमकी कोणती, शामी की शार्दूल ठाकूर कोणाला किती आणि कधी संधी द्यायची, असे प्रश्न भारताला येणाऱ्या काही दिवसांत सोडवायचे आहेत. सुदैवाने मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमरा धारदार गोलंदाजी करतोय. आणि कुलदीप यादवची फिरकीही चालतेय. आशिया चषकानंतर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. तर भारताची विश्वचषकातील सलामीची लढत ८ ऑक्टोबरला चेन्नईत होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community