-
ऋजुता लुकतुके
एकदिवसीय क्रिकेटमधील आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानासाठी सध्या ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि भारत या तीन संघांमध्ये चुरस आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये भारतीय संघाला अव्वल स्थान गाठण्याची संधीही आहे. कशी ते बघूया. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. आणि त्यापूर्वी आयसीसी क्रमवारीतील चुरस वाढलेली दिसतेय. सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ११८ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. पण, भारतीय संघाकडे ११६ गुण आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या सुरू असलेल्या आशिया चषकातच भारतीय संघ पाकिस्तानला मागे टाकू शकतो. भारताला अव्वल स्थानावर नेणारं हे गणित आणि त्यासाठीच्या शक्यता काय आहेत ते पाहूया…
पाकिस्तानचं आव्हान कसं परतवता येईल?
ऑस्ट्रेलियन संघ नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना हरला आहे. तर पाकिस्ताननेही सुपर ४ मधील भारताविरुद्धची लढत गमावली. या दोन पराभवांमुळे आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पुन्हा मिळवण्याची संधी भारतीय संघाला चालून आली आहे. मार्च २०२३ पर्यंत क्रमवारीत भारतीय संघच अव्वल होता. पाकिस्तानला अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी महत्त्वाची आहे ती सुपर ४ मधील श्रीलंके विरोधातील लढत. ही लढत जिंकून एकतर त्यांना आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता येईल. आणि तिथे पुन्हा भारताविरुद्ध त्यांना जिंकावंच लागेल आणि श्रीलंकेविरुद्धचा सुपर ४ सामना त्यांनी गमावला, तर आशिया चषकानंतर त्यांना सामने खेळण्याच्या फारशा संधी मिळणार नाहीत. त्यांची पुढील लढत थेट विश्वचषकाचा सराव सामनाच असेल.
दुसरीकडे, भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध शुक्रवारी खेळणार आहे. हा सामना जिंकण्याची संधी संघाकडे आहे. शिवाय अंतिम फेरीतील त्यांचा प्रवेशही नक्की आहे. आशिया चषकाचा अंतिम सामना भारतीय संघाने जिंकला आणि त्यातही तो पाकिस्तान विरुद्ध जिंकला, तर भारतीय संघ क्रमवारीत मोठी झेप घेऊ शकेल. त्यामुळे भारतासाठी महत्त्वाचा आहे तो आशिया चषकातील विजय. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघही मजबूत दावेदार आहे.
(हेही वाचा – Gold Smuggling : लहान मुलाच्या डायपरमधून सोन्याची तस्करी, जोडप्याला अटक)
ऑस्ट्रेलियाला मागे टाकता येईल का?
भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकणं हे तसं बघितलं तर ऑस्ट्रेलियाच्या निकालांवर अवलंबून आहे. म्हणजे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी दोन एकदिवसीय सामने त्यांनी जिंकले, तर ते अव्वल स्थानावर कायम राहतील. पण, एक जरी गमावला, तरी त्यांचं स्थान डळमळीत होईल. आणि भारताला संधी प्राप्त होईल. कारण, ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकण्यासाठी दोन्ही सामने जिंकणं आवश्यक आहे. दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने गमावले तर क्रमवारीतील त्यांची पिछेहाट अनिवार्य आहे. दुसरीकडे भारतीय संघ आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलियाबरोबरच आणि ते ही मायदेशी मालिका खेळणार आहे. या मालिकेतही भारताला ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची संधी असेल.
पण, त्यासाठी आधी भारताला आशिया चषक जिंकावा लागेल. आणि त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निदान आणखी एक सामना हरावा लागेल. तसं बघितलं तर, विश्वचषक स्पर्धेपूर्वी तीनही संघांपैकी भारतीय संघच सगळ्यात जास्त एकदिवसीय सामने खेळणार आहे. पण, भारतासाठी संघाच्या वैयक्तिक विजयांबरोबरच ऑस्ट्रेलियाने त्यांचे सामने गमावणंही गरजेचं आहे. एकूणच खेळात हर-जीत ही होतच असते. पण, त्यामुळे जी चुरस निर्माण होते ही उत्कंठा वाढवणारी असते. तसंच आता आयसीसी एकदिवसीय क्रमवारीच्या बाबतीत झालंय.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community