ऋजुता लुकतुके
क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी (१४ सप्टेंबर) आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीचा (Asian Games 2023) अंतिम संघ जाहीर केला आहे. आधी निवडलेल्या संघात २२ खेळाडूंचा नव्याने समावेश करण्यात आलाय. तर २५ खेळाडू बदलले आहेत. काही ॲथलीट्स बरोबरच प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफही बदलण्यात आला आहे. आशियाई क्रीडास्पर्धेत (Asian Games 2023) ३९ क्रीडा प्रकारांत मिळून ६५५ खेळाडू सहभागी होणार आहेत. २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान चीनच्या होआंगझाओ इथं आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games 2023) रंगणार आहेत. आणि त्यासाठी ६५५ खेळाडूंबरोबर २६० प्रशिक्षकही आहेत.
आज ज्या खेळाडूंची नव्याने निवड झाली त्यातले तीन खेळाडू नेमबाज आहेत. मनिषा कीर, प्रीती रजक आणि अंगद वीर सिंग बाजवा हे नेमबाजही आता होआंगझाओला जाणार आहेत. तर अमलन बोरगोहेन, प्रीती आणि प्राची यांचा ॲथलेटिक्स प्रकारासाठी संघात समावेश झाला आहे.
जू-जित्सू या खेळात अन्वेशा देव, निकिता चौधरी, उमा महेश्वर, कमल सिंग आणि तरुण यादव या खेळाडूंचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. तर जलतरण प्रकारात जान्हवी चौधरीचा समावेश करण्यात आला आहे. वुशूमध्ये सूरज यादव तर मयंक चाफेकरची निवड पेंटाथॉनसाठी झाली आहे.
विशाल रुही, केशव, सुचिका तरियाल आणि ज्योती तोकास यांची निवड कुराश प्रकारात झाली आहे. सर्व खेळाडूंना दिवसाला ५० अमेरिकन डॉलर इतका भत्ता मिळेल. त्यातच खेळाडूंनी त्यांचं जेवण आणि इतर खर्च करायचा आहे. तर तिथे राहण्याच्या खर्चासाठीही क्रीडा प्राधिकरणाकडून दैनंदिन भत्ता मिळणार आहे. पण, तो होआंगझाओमध्ये पोहोचल्यावर ठरवला जाईल. पैसे खेळाडूंच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा केले जातील.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community