Shikhar Savarkar Purskar : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘शिखर सावरकर’ पुरस्कारांचे वितरण

215
राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते हरीश कपाडिया यांना 'शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार 2023' ने सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी उपस्थित स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गिर्यारोहण क्षेत्रासाठीच्या शिखर सावरकर पुरस्कार २०२३ (Shikhar Savarkar Purskar) चे वितरण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी राजभवन येथे करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गिर्यारोहणात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हरिश कपाडिया यांना यावेळी मानाचा ‘शिखर सावरकर जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, गिर्यारोहणाच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन आणि सामाजिक कार्यास मोठ्या प्रमाणात हातभार लावणाऱ्या ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ या संस्थेची उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था म्हणून निवड करण्यात आली. गिर्यारोहणात विशेषतः सह्याद्री विभागात विशेष प्राविण्य दाखविणाऱ्या उदयोन्मुख युवा गिर्यारोहक मोहन हुले यांना ‘शिखर सावरकर युवा शौर्य पुरस्कार- २०२३’ने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कारार्थींची ओळख

  • हरीश कपाडिया यांना ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्कार 2023’ ने (Shikhar Savarkar Purskar) सन्मानित करण्यात आले. गिर्यारोहक म्हणून त्यांनी असंख्य यशस्वी मोहिमांचे नेतृत्व केले आहे. हिमालयाच्या शिखरांवर त्यांनी 178 मोहिमा केल्या आहेत.   कपाडिया यांनी त्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि पंचमढी पर्वतरांगांवर 1200 किमी पेक्षा जास्त चढाई केली आहे. शिवाय पाच दशके गिर्यारोहण क्षेत्राचा प्रचार, प्रशिक्षण कार्य आणि पुस्तके, मासिकांच्या माध्यमातून ज्ञानवृद्धीचे कार्य त्यांनी केले आहे. याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
  • दुर्ग संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ला ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार २०२३’ने सन्मानित करण्यात आले. ही संस्था गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाच्या उद्देशाने २००७ पासून कार्यरत आहे. मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, कोल्हापूर आणि नाशिक अशा राज्यातील ८ जिल्ह्यांत आणि १४ गडकोटांवर संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. गडकिल्ल्यांच्या जतन-संवर्धनासह दुर्लक्षित वीरगळ, वाड्यांचे जोते, विहिरी, प्राचिन अवशेषांचे संवर्धन करण्याचे कार्यही दुर्गवीर प्रतिष्ठानकडून केले जाते. त्याशिवाय नैसर्गिक आपत्तींवेळी मदतकार्यही राबविले जाते.
  • पर्वतारोहण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मोहन हुले यांना ‘शिखर सावरकर युवा शौर्य पुरस्कार- २०२३’ (Shikhar Savarkar Purskar) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मोहन हुले हे प्रशिक्षित तरुण गिर्यारोहक आहेत, ते गिर्यारोहकांच्या नवीन पिढीलाही प्रशिक्षित करीत आहेत. दुर्गम डोंगराळ भागात होणारे अपघात कमी करण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत. कोरोना संक्रमण काळातही त्यांनी केलेली जनसेवा उल्लेखनीय आहे. मोहन हुले हे राजस्थानमधील माउंट अबू येथील स्वामी विवेकानंद पर्वतारोहण संस्थेत अतिथी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या गिर्यारोहण मोहिमांमध्ये त्यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अत्यंत दुर्गम शिखरांवर आणि किल्ल्यांवर चढाई केली. त्यांनी माउंट अबूच्या शिखरांवर यशस्वी गिर्यारोहण मोहीमही राबवली होती. हिमालयातील मच्छधर पर्वत आणि हनुमान टिब्बा पर्वतावरील यशस्वी गिर्यारोहण त्यांच्या यशस्वी कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.