Shikhar Savarkar Puraskar : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकने भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकावे – राज्यपाल रमेश बैस

या संस्थेचे खेळाडू देश-विदेशात महाराष्ट्राचे नाव मोठे करीत आहेत.

132
Shikhar Savarkar Puraskar : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकने भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकावे - राज्यपाल रमेश बैस
Shikhar Savarkar Puraskar : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकने भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकावे - राज्यपाल रमेश बैस

दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या संस्थेने गेल्या काही वर्षांत क्रीडा क्षेत्रात मोठे नावलौकिक कमावले आहे. या संस्थेचे खेळाडू देश-विदेशात महाराष्ट्राचे नाव मोठे करीत आहेत. आता सावरकर स्मारकाने भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकावे, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे ‘शिखर सावरकर’ पुरस्कार (Shikhar Savarkar Puraskar) राज्यपालांच्या हस्ते शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी राजभवन येथे वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

हिमाचल प्रदेशमधील न सर होणारे शिखर काही गिर्यारोहकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५०व्या पुण्यतिथी दिवशी सर केले. या शिखराला ‘शिखर सावरकर’ असे नाव देण्यात आले, ही माहिती मला आज कळली आणि ऊर अभिमानाने भरून आला. स्वातंत्र्यवीर सावरकर जातीभेदाचे कडवे विरोधक होते. त्यामुळे जातीभेद समाप्त करणे हीच त्यांना सच्ची श्रद्धांजली ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील प्रत्येक गडकिल्ल्याची स्वतःची गाथा आहे. रायगड, शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड के शिवकालीन किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही, तर संपूर्ण देशाचा जिवंत सांस्कृतिक वारसा आहे. राज्यातील किल्ले हे राज्याचे तसेच संस्कृतीचे रक्षक असून विशेषज्ञांच्या मदतीने त्यांचे रक्षण व जीर्णोद्धार केला पाहिजे तसेच तेथे शैक्षणिक पर्यटन वाढवले पाहिजे, असे मत रमेश बैस यांनी व्यक्त केले. पावसाळ्याच्या दिवसात किल्ल्यांवर होणाऱ्या पार्ट्यांबाबत वाचतो त्यावेळी मनाला वेदना होतात असे सांगून स्थानिक लोकांच्या मदतीने किल्ल्यांच्या वारस्याचे जतन केल्यास आणि जबाबदार पर्यटनाला चालना दिल्यास त्यातून किल्ल्यांचे रक्षण होईल आणि रोजगार निर्मिती देखील होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

शिवरायांचे स्मरण करून ५५० पायऱ्या चढलो – राज्यपाल

किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. राज्यात ३५० किल्ले आहेत. मी स्वतः प्रतापगडावर गेलो. तेव्हा कलेक्टर म्हणाले, ५५० पायऱ्या आहेत, तुम्ही चढू शकणार नाहीत. पण, मी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले आणि चढाईला सुरुवात केली, म्हणता म्हणता सर्व पायऱ्या चढून गेलो. शिवरायांच्या किल्ल्यांवरची स्थापत्यशैली अद्भुत अशी आहे. शेकडो वर्षे झाली तरी आजही काही किल्ले भक्कमपणे उभे आहेत. आजच्या युगात एखाद्या इमारतीचे उद्घाटन करावे आणि काही दिवसांत ती कोसळावी, अशी स्थिती आहे. त्यामुळे गड दुर्गांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असेही राज्यपाल म्हणाले.

(हेही वाचा :Shikhar Savarkar Purskar : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘शिखर सावरकर’ पुरस्कारांचे वितरण)

सावरकर साहसाचे पुरस्कर्ते – रणजित सावरकर

वीर सावरकरांच्या विचारधारेचा पुरस्कार करणे, हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे काम आहे. तरीही तुम्ही गिर्यारोहणाचे पुरस्कार सावरकरांच्या नावाने का देता, असा प्रश्न अनेकजण विचारतात. या व्यक्तींना बहुतांशी सावरकरांचे कार्य ज्ञात नसते. पण, गिर्यारोहण म्हणजेच सावरकर; कारण हा एक साहसी प्रकार आहे आणि सावरकर हे साहसाचे पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५०व्या पुण्यतिथीच्या वर्षी काही गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेश येथे आजवर सर केले नाही असे शिखर सर केले होते. व त्या शिखराला २०१८ साली ‘शिखर सावरकर’ हे नाव दिले गेले. गिर्यारोहण हे साहसी तसेच संघटनात्मक कार्य असल्यामुळे सावरकर स्मारकातर्फे गिर्यारोहकांना २०२० पासून ‘शिखर सावरकर’ पुरस्कार दिले जातात, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दिली.

कपाडिया हिमालय पुत्र

हिमालयन जर्नलचे संपादक व ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया यांनी हिमालय पर्वत शृंखलेच्या केलेल्या अध्ययनाचा गौरव करून राज्यपालांनी त्यांचे ‘शिखर सावरकर जीवन गौरव’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. हरीश कपाडिया हे वास्तवात हिमालय पुत्र आहेत, असे राज्यपाल म्हणाले. कपाडिया यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांचे सुपुत्र हुतात्मा लेफ्टनंट नवांग कपाडिया यांना समर्पित करीत असल्याचे यावेळी सांगितले.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.