Social Media Influencer Burglary Case : सोशल मीडियावरील ‘इन्फ्लुएंसर’ अभिमन्यू गुप्ताला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

जामिनावर बाहेर पडल्यावर त्याने पुन्हा घरफोड्यांचे सत्र सुरू केले होते अशी माहिती नलावडे यांनी दिली.

202
Social Media Influencer Burglary Case : सोशल मीडियावरील 'इन्फ्लुएंसर' अभिमन्यू गुप्ताला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक
Social Media Influencer Burglary Case : सोशल मीडियावरील 'इन्फ्लुएंसर' अभिमन्यू गुप्ताला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

एकेकाळी १० लाख फॉलोअर्स असलेल्या सोशल मीडियावरील ‘इन्फ्लुएंसर’ अभिमन्यू गुप्ता हा जुगार आणि प्रेयसीच्या नादी लागून घरफोड्या करायला लागला आहे. साकिनाका पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्यात अभिमन्यूला रांची मधून नुकतीच अटक करून मुंबईत आणले आहे. मुंबई, नवी मुंबईत आणि ठाण्यात त्याच्यावर १३ घरफोडींचे गुन्हे दाखल असल्याची माहिती परिमंडळ १० चे पोलिस उपआयुक्त दत्ता नलावडे यांनी दिली. काही गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती, जामिनावर बाहेर पडल्यावर त्याने पुन्हा घरफोड्यांचे सत्र सुरू केले होते अशी माहिती नलावडे यांनी दिली.

मुंबईतील साकिनाका परिसरात ५ सप्टेंबर रोजी एका वॉटर प्युरिफायर वितरकाच्या फ्लॅटमध्ये साडेतीन लाख रुपयांची घरफोडी झाली होती. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता त्यात घरफोडी करणारा संशयित आरोपी आढळून आला. पोलिसांनी या फुटेज वरून आरोपीची माहिती काढली असता घरफोडी करणारा आरोपी हा युट्युबर अभिमन्यू गुप्ता असल्याची माहिती समोर आली. साकिनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश शिंदे, उपनिरीक्षक रवींद्र नांगरे यांचे पथक तयार करण्यात आले.

(हेही वाचा – Footpath Collapsed In Mulund : मुलुंडमध्ये फूटपाथ खचून दुचाकींचे नुकसान)

अभिमन्यू हा रांची येथे असल्याची माहिती मिळाली आणि पोलीस पथक रांची येथे रवाना झाले. गुरुवारी त्याला रांची मधून अटक करून तेथील स्थानिक न्यायालयात ट्रँझिस्ट रिमांड वरून त्याला मुंबईत आणण्यात आले. पोलीस पथकाने त्याच्याकडून चोरी केलेला सर्व ऐवज जप्त केला. त्याची चौकशी केली असता, मागील काही वर्षांपासून अभिमन्यूला कॅसिनो मध्ये जुगार खेळण्याचा आणि प्रेयसीवर पैसे उडविण्याचा नाद लागला होता. सोशल मीडियावर १० लाख फॉलोअर्स असलेल्या गुप्ताला मौजमजा तसेच प्रेयसी आणि जुगार खेळण्यासाठी पैसे कमी पडू लागल्याने त्याने चोरीचा मार्ग पत्करला. चोरी करून येणाऱ्या पैशातून तो स्वतःची आणि प्रेयसीची हौस पूर्ण करीत होता. मागील ४ वर्षात त्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात १३ पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे केले आहे. अनेक गुन्ह्यात त्याला अटक देखील झाली होती. मात्र, जामिनावर बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा चोरीच्या मार्गाकडे वळत होता अशी माहिती पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.