BMC : उत्सव काळात महानगरपालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सजग राहावे

प्रभारी आयुक्त तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे निर्देश

161
BMC : उत्सव काळात महानगरपालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सजग राहावे
BMC : उत्सव काळात महानगरपालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सजग राहावे

श्री गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीतील रस्ते या दोन्ही बाबींवर सर्वाधिक प्राधान्याने लक्ष पुरवावे, या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे. अंमलबजावणी आणि कार्यवाही करूनही अपेक्षित परिणाम साध्य होत नसेल तर त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना करणे हे आपले कर्तव्य आहे. संपूर्ण उत्सव कालावधीत महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी अधिक कार्यतत्पर आणि सजग राहावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. मंगळवार १९ सप्टेंबर २०२३ पासून श्री गणेशोत्सव प्रारंभ होत आहे. त्या अनुषंगाने उत्सवाच्या पूर्वतयारीचा फेर आढावा घेण्यासाठी शनिवारी १६ सप्टेंबर २०२३ अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) तथा प्रभारी आयुक्त आश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व सहायक आयुक्त या बैठकीस उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना भिडे म्हणाल्या की, श्री गणेशोत्सव कालावधीत भाविकांचा वावर सगळीकडे असतो. अशावेळी भाविकांना आणि एकूणच सर्व नागरिकांना कोणतीही असुविधा होणार नाही, यादृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विशेषत्वाने सार्वजनिक स्वच्छता आणि खड्डेविरहित रस्ते यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवणे आवश्यक आहे. मागील काही दिवसात पावसाने रस्त्यांवर खड्डे झालेले आढळल्यास ते तातडीने भरुन वाहतूक सुरळीत राहील, विशेषत्वाने मूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गांवर गैरसोय होणार नाही, अशारितीने नियोजन आणि कार्यवाही करावी, असे त्या म्हणाल्या. महानगरपालिकेने धोकादायक पुलांची नावे यापूर्वीच जाहीर केली आहेत. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून रहदारी सुरळीत ठेवावी, तसेच पुलांच्या दुतर्फा माहिती फलक लावावेत, अश्या सूचनाही त्यांनी केल्या.

मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेच्या अनुषंगाने भिडे यांनी निर्देश देताना सांगितले की, मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईतील प्रमुख रस्त्यांप्रमाणेच लहान सहान रस्ते, गल्लीबोळ, झोपडपट्टी आणि तत्सम वस्ती अशा सर्व ठिकाणी स्वच्छता राखण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार कार्यवाही वेग घेत असली तरी श्री गणेश उत्सवाच्या काळात अधिक सजगतेने आणि कार्यतत्परतेने कामकाज करणे आवश्यक आहे. विशेषतः गणेश मंडपाच्या परिसरात भाविकांचा वावर अधिक असेल हे लक्षात घेऊन जास्तीचे मनुष्यबळ नेमाने, कचरा संकलन पेटी उपलब्ध करून देणे ही कार्यवाही पूर्ण करावी. कचरा संकलन व वहन अधिक क्षमतेने करावे, कचरा संकलन आणि वाहतूक फेऱ्यांची वारंवारता वाढवावी. ज्या विशिष्ट भागात तक्रारी असतील अशा वस्ती, परिसरावर अधिक लक्ष केंद्रित करावे, अशी सूचनाही भिडे यांनी केली.

(हेही वाचा – Sanjay Raut : संसदेच्या विशेष अधिवेशनात संजय राऊतांवर कारवाई होणार?)

बैठकीतील इतर ठळक मुद्दे –
  • श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी १९१ कृत्रिम तलावांची निर्मिती पूर्णत्वाकडे. आणखी तलाव बांधण्याचे प्रयत्न.
  • नागरिकांच्या सोयीसाठी वाहन आधारित फिरते कृत्रिम तलावही तैनात.
  • मिरवणूक मार्गातील झाडांच्या फांद्यांची छाटणी पूर्ण.
  • मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या वायर काढल्या जाव्या.
  • विसर्जन स्थळावर कार्यरत स्वयंसेवकांची विभाग स्तरावर बैठक घेणार.
  • प्रमुख विसर्जन स्थळावर पेयजल मोफत पुरवणार.
  • विसर्जन स्थळानजीक सशुल्क प्रसाधनगृह नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून देणार.
  • उत्सव काळात वाहतुकीचा विचार करता विसर्जन. स्थळाजवळ शक्य तितके वाहनतळ विनाशुल्क उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.
  • आवश्यक त्या विसर्जन स्थळावर जर्मन तराफे अधिक संख्येने उपलब्ध होणार.
  • सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडप परिसरात अधिकाधिक कचरा संकलन पेट्या ठेवणार.
  • वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वयंसेवकांची मदत.
  • उत्सव काळात मिठाई दुकाने, आस्थापनांची अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने नियमितपणे तपासणी.
  • विसर्जन ठिकाणी अधिकाधिक निर्माल्य कलश.
  • निर्माल्य वाहक फिरते वाहन उपलब्ध असेल.
  • धोकादायक पुलांच्या दोन्ही बाजूंना अधिक अंतरापर्यंत माहिती फलक लावणार.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.