-
ऋजुता लुकतुके
आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंकन संघांदरम्यान कोलंबोला रंगणार आहे. पण, या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढत चालली आहे. अक्षर पटेलला बॅक अप म्हणून भारतीय संघ प्रशासनाने वॉशिंग्टन सुंदरला कोलंबोला बोलावलं आहे. शेवटच्या सुपर ४ सामन्यात बांगलादेश विरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाकडे फारसा वेळ नाही. रविवारी लगेचच संघाला श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज व्हायचंय. बांगलादेश विरुद्धच्या पराभवामुळे संघातील फलंदाजीचे कच्चे दुवेही उघड झालेत. त्यावर संघाला काम करावं लागणार आहे. विराट, हार्दिक, जसप्रीत बुमरा हे प्रमुख खेळाडू संघात परततील ही जमेची बाजू असली तरी खेळाडूंच्या दुखापती ही संघासमोरची नवीन समस्या आहे.
जखमी अक्षरला वॉशिंग्टन सुंदरचा बॅक अप
शुक्रवारी बांगलादेश विरुद्ध अक्षर पटेलने ४२ धावांची धुवाधार खेळी केली. संघाचा पराभव तो वाचवू शकला नाही. पण, तळाला येऊन अष्टपैलू खेळ करणाऱ्या अक्षरने आपली उपयुक्तता दाखवून दिली. पण, नेमका बांगलादेश विरुद्ध खेळताना अक्षरच्या हातावर चेंडू बसून तो सुजला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमीच आहे.
अशावेळी अक्षरला पर्याय म्हणून भारतीय संघ प्रशासनाने तातडीने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला कोलंबोला पाठवलं आहे. अक्षरच्या दुखापतीविषयी मात्र अजून कुठलीही स्पष्टता नाही. तो अंतिम सामना आणि पुढील ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळेल की नाही, याबद्दल बीसीसीआयने काहीही कळवलेलं नाही.
वॉशिंग्टन सुंदर यापूर्वी जानेवारी महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध वन डे सामना खेळला होता. भारतीय संघासाठी तोच त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. वॉशिंग्टन भारतासाठी आतापर्यंत १६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला आहे. आणि यात त्याने २९ च्या सरासरीने २३३ धावा केल्या आहेत. तर १६ बळीही घेतले आहेत.
(हेही वाचा – BMC : उत्सव काळात महानगरपालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी सजग राहावे)
अंतिम सामन्यात कुणाचं पारडं जड?
सगळ्यांना उत्सुकता आहे ती १७ तारखेला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर रंगणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम सामन्याची. भारतीय संघावर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या दुखापतीचं सावट आहे. खासकरून श्रेयस अंतिम सामन्यात खेळेल का याची उत्सुकता सगळ्यांना असेल.
कर्णधार रोहीत शर्मा, शुभमन गिल आणि के एल राहुल यांची स्पर्धेतील कामगिरी सरस आहे. विराट कोहलीनेही पाकिस्तानविरुद्ध १२२ धावांची खेळी केली आहे. पण, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि इशान किशनला आपला खेळ उंचवावा लागणार आहे. अजूनही भारतीय फलंदाजी एकजीव होऊन धावा करताना दिसत नाही. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी ही गोष्ट संघ प्रशासनाला नक्कीच सलत असणार.
तुलनेनं भारतीय गोलंदाजी जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांच्यामुळे प्रभावी आहे. पण, धावा रोखण्याचं काम या गोलंदाजांना करावं लागणार आहे. सुपर ४मध्ये भारताने आधीचा लंकेविरुद्धचा सामना जिंकून त्यांची १४ विजयांची मालिका खंडित केली होती. पण, श्रीलंकन संघ लयबद्ध आहे. आणि सध्या छान खेळतोय. त्यांना जायबंदी थिक्षणाची उणीव मात्र जाणवणार आहे. दोन्ही संघ आशिया चषक जिंकून एकदिवसीय विश्वचषकासाठी सिद्ध होण्याचाच प्रयत्न करतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community