सचिन धानजी, मुंबई
ना. म. जोशी मार्ग आणि गणपत पाटील मार्गावरील लोअर परळमधील डिलाईल पुलाच्या बांधकामातील आणखी एक मार्गिका रविवार, १७ सप्टेंबर रोजी खुली करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात या पुलाच्या बांधकामात तब्बल ४० कोटींनी वाढ झाली आहे. ही वाढ या पुलावर बसवण्यात येणाऱ्या ध्वनीरोधक यंत्रणा तसेच पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांसह लोअर परेल रेल्वे स्टेशन ते मोनोरेल रेल्वे स्टेशनपर्यंत स्कायवॉक उभारण्यात येणार असल्याने या खर्चात वाढ झाल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या लोअर परळ येथील पुलाच्या कामासाठी जानेवारी २०२० मध्ये कंत्राटदाराची नियुक्ती करून या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ११४ कोटी रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली होती. या बांधकामासाठी जीएचव्ही (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली होती आणि पावसाळा वगळून हे काम १८ महिन्यांमध्ये म्हणजे हे काम मार्च २०२२ पर्यंत होणे अपेक्षित होते. परंतु पश्चिम रेल्वेच्या मार्फत या रेल्वेवरील पुलाचे काम विलंबाने सुरु झाल्यावर पावसाळा वगळून सहा महिने एवढा कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे या पुलाचे बांधकाम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण अपेक्षित होते. परंतु या नियोजित वेळेत या पुलाचे बांधकाम पूर्ण होत नसून उलट या बांधकामाचा खर्च तब्बल ४० कोटी रुपयांनी वाढला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या वाढीव खर्चासाठी संबंधित कंत्राटदाराला आणखी ९ महिन्यांचा कालावधी वाढवून दिला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोअर परळ येथील एक मार्गिका आधीच खुली करून देण्यात आली असून गणपत पाटील मार्गावरील पोहोच रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे, तेही पूर्ण होत आहे. तर ना. म. जोशी मार्ग (दक्षिण) येथील पोहोच रस्त्याचे काम पश्चिम रेल्वेवरील पुलाचे काम झाल्यानंतर सुरु करण्यात आले आहे. त्यातील एक मार्गिका रविवारी सुरु करण्यात आली आहे. या पुलाचे पोहोच रस्त्याचे काम करताना या पुलावर ध्वनीरोधक यंत्रणा बसवणे तसेच पोहोच रस्त्याच्या बाजुवरील (सेवा रस्ते) मार्गाचे काम करतांना पर्जन्य जलवाहिनीचे काम करणे आवश्यक असल्याने ते काम केले जाणार आहे. तसेच लोअर लोअर परेल रेल्वे स्टेशन ते मोनोरेल रेल्वे स्टेशन यांना जोडण्यासाठी स्कायवॉकचे बांधकाम केले जाणार असल्याने हा खर्च वाढला असल्याचे पूल विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे सुमारे ११४ कोटी रुपयांवरून हा खर्च आता ३३ कोटी रुपयांनी वाढल्याने एकूण खर्च १४६ कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे.
(हेही वाचा – Cobra Commando : जम्मू-काश्मीरमध्ये कोब्रा कमांडोची तुकडी पहिल्यांदाच तैनात)
परळच्या पुलाच्या डागडुजीसाठी खर्च केले पावणे दोन कोटी
कोरोना काळात परेल टी. टी येथील पुलाचा पृष्ठभाग खराब झाला होता. त्यामुळे पावसाळ्या पूर्वी या पुलाचा भाग सुस्थितीत आणण्यासाठी नव्याने निविदा मागवून नवीन कंत्राटदाराकडे हे काम सोपवण्याऐवजी महापालिका प्रशासनाने लोअर परळच्या पुलासाठी नियुक्त करण्यात आलेल्या या कंत्राटदाराकडून या पुलावरील खड्डे बुजवून घेण्याचे काम केले. यासाठी १ कोटी ९८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामुळे लोअर परळच्या पुलाच्या बांधकामाचा खर्च वाढलेला असून या पुलाच्या कामामध्ये पोहोच मार्गामध्ये मातीचा भराव करणे आणि पुलाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी बूमप्लेसरचा उपयोग करण्यात आला, त्यामुळेही हा खर्च वाढल्याचे बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community