Ganeshotsav 2023 : सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कधी आणि कुणी सुरू केला ? वाचा सविस्तर…

महाराष्ट्रात घरोघरी गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळातील आहे

602
Ganeshotsav 2023 : सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कधी आणि कुणी सुरू केला ? वाचा सविस्तर...
Ganeshotsav 2023 : सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कधी आणि कुणी सुरू केला ? वाचा सविस्तर...

देशभरात सध्या गणपती बाप्पाच्या (Ganeshotsav 2023) आगमनाची ओढ भाविक-भक्तांना लागली आहे. फक्त महाराष्ट्रापुरता नाही, तर देशाचा सांस्कृतिक उत्सव असलेल्या या सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरुप नेमके कोणी दिले ? लोकमान्य टिळक की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी ? याविषयी जनमानसात विविध मतभेद वाचायला आणि ऐकायला मिळतात. पाहूया, पहिला गणेशोत्सव नेमका कुणी साजरा केला याविषयी माहिती-

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी व्यवसायाने वैद्य होते. स्वत:च्या दुमजली घरात ते धर्मार्थ दवाखाना चालवत असत. त्यांनी रुग्णसेवेचे व्रत घेतले होते. त्यांचा आध्यात्मिक क्षेत्राचाही गाढा अभ्यास होता. संत जंगली महाराजांशी त्यांचे चांगले संबंध होते. भाऊसाहेबांच्या कुटुंबाचा शालूंना रंग देण्याचा पारंपरिक व्यवसाय होता. त्यामुळे त्यांना रंगारी या नावाने ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोशात त्यांच्या नावाचा उल्लेख आहे.

1892 साली पहिला गणेशोत्सव
सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्याचा दावा भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने 2017 साली पहिला गणेशोत्सव सुरू केल्याचा दावा केला होता. भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 साली पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यांच्या मते, लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. तत्पूर्वी, 2 वर्षे अगोदर म्हणजे 1892 मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.

वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीची स्थापना
भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 मध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली. ही मूर्ती राक्षसावर प्रहार करून त्याचा नायनाट करणारी होती. लाकूड व भुशाचा वापर करून ती तयार करण्यात आली होती. ही मूर्ती अद्यापही बदलण्यात आली नाही, असा दावा आजही केला जातो.

कशी झाली सुरुवात ?
पुण्यातील गणेशोत्सवाबाबत लेखक मंदार लवाटे यांनी ‘पुण्यातील गणेश विसर्जन उत्सव 121 वर्षांचा’ नामक पुस्तक लिहिले आहे. लवाटे आपल्या पुस्तकात म्हणतात, मोडी पत्रांच्या आधारे आपण हे सांगू शकतो की, महाराष्ट्रात घरोघरी गणपती बसवण्याची परंपरा शिवपूर्व काळातील आहे. पुणे-औंध भागातील लोक गणपती विसर्जनासाठी ओळीने जात असत. या रांगेत सर्वांत पुढे त्या गावचा पाटील असे.

लवाटे यांच्या पुस्तकानुसार, बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशव्यांनी शनिवारवाड्यात मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पेशव्यांचे सरदार त्यांचे अनुकरण करू लागले होते. त्यानुसार पुरंदरसारख्या किल्ल्यांवरही गणेशोत्सव साजरा केला जावू लागला.

इंग्रजांची सत्ता आल्यावरही 1819-20 साली दफ्तरखान्यात ब्रिटिशांच्या पैशांनी गणपती बसवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. ब्रिटिशांची सत्ता आली तेव्हा पुण्यातील घरोघरी गणपती बसत होते, श्रीमंत सरदारांकडे गणपती बसत होते, एवढेच काय तर देवदासींच्या घरांतसुद्धा गणपती विराजमान होत होते.

1893 साली विश्वनाथ खासगीवाले ग्वाल्हेरला गेले. तिथे त्यांनी एका सरदाराच्या घरी थाटामाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला. त्यानंतर भाऊ रंगारी, घोटावडेकर आणि खासगीवाले यांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली, असा दावा लवाटे करतात. विशेष म्हणजे खासगीवाले ग्वाल्हेरहून परत आल्यानंतरच पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात झाली या मताशी भाऊ रंगारी यांचे वंशजही सहमती दर्शवतात. ते केवळ ते वर्ष 1893 नाही तर 1892 होते असे म्हणतात.

खासगीवाले 1892 ला ग्वाल्हेरहून परतले. त्यानंतर रंगारी यांच्या घरी बळवंत सातव, गणपतराव घोटवडेकर, सांडोबाराव तरवडे, खासगीवाले, बाळासाहेब नातू, लखीशेठ दंताळे, आप्पासाहेब पटवर्धन व दगडूशेठ हलवाई आदींची एक बैठक झाली. या सर्वांच्या पुढाकाराने 1892 मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. खासगीवाले, घोटवडेकर व रंगारी यांनी 3 ठिकाणी गणपती बसवले. त्यानंतर 10 व्या दिवशी त्याचे वाजत गाजत विसर्जन केले, असे रंगारींचे वंशज सांगतात.

लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला कधी सुरुवात केली ?
लोकमान्य टिळक यांनी 1894 मध्ये पुण्यातील विंचूरकर वाड्यात गणेशाची स्थापना केली. त्यावर्षी पुण्यात 100 हून अधिक सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली होती. टिळकांच्या केसरी वृत्तपत्रातही याचा उल्लेख करण्यात आला होता.

सार्वजनिक गणेशोत्सवाला दिशा देणारे लोकमान्य टिळक
तज्ज्ञांच्या मते, भाऊसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सवाला सर्वप्रथम सार्वजनिक रूप दिले, पण त्याला व्यापक स्वरूप व दिशा देण्याचे काम टिळकांनी केले. बिपान चंद्रा यांच्या मते, गणेशोत्सव व शिवजयंतीचे निमित्त साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केले. त्यांनी 1893 पासून गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांच्या प्रसार-प्रचारासाठी केला.

दोघांचेही सौहार्दपूर्ण संबंध…
लोकमान्य टिळक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध होते. रंगारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्यानंतर टिळकांनी केसरीमधून त्यांचे कौतुक केले होते. टिळक हे रंगारी यांच्या गणपती ट्रस्टचे विश्वस्त असल्याचा दावाही या प्रकरणी केला जातो.

मुंबईतला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव

लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये गणेशोत्सवास सुरुवात केली. त्याचवर्षी मुंबईच्या गिरगावात केशवजी नाईक नामक चाळीत सार्वजनिक गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ही चाळ खाडीलकर मार्ग चर्नी रोड येथे आहे. या चाळीत टिळकांचे रावबहाद्दुर लिमये आणि नरहरिश्तरी गोडसे हे अनुयायी राहत होते. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि या चाळीत गणेशोत्सव साजरा केला, असे सांगितले जाते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.