राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार हे संसदेच्या विशेष अधिवेशनच्या निमित्ताने दिल्लीला गेले आहेत. संसदेत मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले आहे. हे विधेयक मंजूरही होण्याची शक्यता असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.त्या दोघांनी एकत्र फोटोही काढला, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
एकीकडे अजित पवारांनी सत्तेत सहभागी होत वेगळी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) उभी फूट पडली. दोन्ही गटांमध्ये आता कायदेशीर लढाई होणार आहे. निवडणूक आयोगात पुढच्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवातही होणार आहे. यातच प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाल्याने घटनेमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेत कॅफेटेरिया येथे भेट झाली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. या सर्व नेत्यांनी नवीन राज्यसभा सभागृहात एकत्रित फोटो काढला, हा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटवरून शेअर केला आहे.
प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
नवीन संसद भवनातील ऊर्जा दिवस! राज्यसभेचे चेंबर हे एक चमत्कार आहे. हा क्षण आदरणीय शरद पवार साहेबांसोबत शेअर केल्याने तो आणखीनच खास बनला. कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि सौहार्दाचा आस्वाद घेतला. खरोखरच लक्षात राहावा असा आजचा दिवस, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. त्यांनी Xवर फोटो शेअर करत या भावना व्यक्त केल्या आहेत.
चर्चांना उधाण
प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाच्या सर्व आमदारांनी याआधीदेखील शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी शरद पवार यांना सत्तेत सहभागी होण्याची विनंती केली होती. पण शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहत आपण विरोधातच राहणार असे सांगत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. शरद पवार राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांध्ये जावून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. शरद पवार सत्ताधाऱ्यांवर टीका करत असताना प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीतील फूट फक्त देखावा तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Join Our WhatsApp Community