पाच महिन्यांपूर्वी नेरूळ ते उरण या बहुप्रतीक्षित मार्गावर चाचणीदरम्यान नेरूळ स्थानकातून निघालेली रेल्वे थेट उरण स्थानकात जाऊन थांबली. पहिल्यांदाच उरण शहरात रेल्वे पोहोचली. तेव्हापासून या मार्गावरील प्रवाशांचे लक्ष या रेल्वेसेवेकडे लागले आहे. आता खारकोपरपर्यंत थांबणारी रेल्वे प्रवाशांना घेऊन उरणला थांबणार, अशी भावना निर्माण झाली होती. मात्र, या मार्गावर रेल्वे चालवण्याचा यशस्वी प्रयोग केल्यानंतर पाच महिने उलटूनही प्रत्यक्षात उरणपर्यंत रेल्वे सेवा सुरू झालेली नाही, मात्र आता या मार्गावरील अडचणी, त्रुटी दूर करण्याच्या सूचना रेल्वे आयुक्तांकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार यावर कामे सुरू आहेत. ही कामे दिवाळीपूर्वी होणे शक्य नसल्याने उरणपर्यंत रेल्वेने प्रवास करण्यासाठी दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यावर्षीच्या मार्च महिन्यात उरणपर्यंतच्या संपूर्ण रेल्वे मार्गाची उभारणी पूर्ण झाल्यावर खारकोपर ते उरण या मार्गावर रेल्वे चालवून या मार्गाची पडताळणी करण्यात आली. उरण स्थानकात रेल्वे पोहोचल्यावर आता रेल्वे सेवा सुरू होणार, अशी आशा सर्वांच्याच मनात निर्माण झाली होती. रेल्वेही हा मार्ग सुरू करण्यासाठी उत्सुक होती, मात्र रेल्वे आयुक्तांनी या कामात काही त्रुटी सांगितल्या. त्या दूर करण्यासाठी सांगितलेली कामे आता पूर्ण होत असतानाच मागच्या महिन्यात झालेल्या पावसात उरण स्थानक पाण्यात बुडाले. स्थानकाच्या भुयारी मार्गात पाणी साचून तळे निर्माण झाले होते. त्यात अनेकांनी पोहण्याचा आंनदही लुटला. यामुळे रेल्वे स्थानकाच्या उभारणीच्या कामात त्रुटी राहिल्याचे जाणवले. स्थानकात पाणी साचू नये याची काळजी ही रेल्वे प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.
(हेही वाचा : Social Media : समाजमाध्यम वापरण्यासाठी वयोमर्यादा हवी)
शिवाय रेल्वेच्या मार्गावरील काही तांत्रिक कामे करण्याचे रेल्वे आयुक्तांकडून सुचवण्यात आले होते. पावसाळ्यात ही कामे व्यवस्थित करता आली नव्हती. ती कामे ही आत्ता सुरू आहेत. याचबरोबर गव्हाण रेल्वे स्थानकाच्या उभारणीचे कामही अद्याप बाकी आहे. त्यालाही वेळ लागणार आहे. दिवाळीपर्यंत ही कामे होण्याचे संकेत आहेत. ते झाल्यानंतरच रेल्वे मंत्रालयाकडून पुन्हा या मार्गावर रेल्वे चालवून मार्गाची चाचपणी केली जाईल आणि त्यानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
पंतप्रधान करणार उद्घाटन
उरण नेरूळ रेल्वे मार्गामुळे सीएसटी ते उरण हा थेट रेल्वेप्रवास करता येणार आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि उरण शहराशी जोडली जाणार आहे. हा महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. स्वतः पंतप्रधान या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे या कामासाठी घाई न करता ते व्यवस्थितपणे काम केले जात आहे.
हेही पहा –