केरळमध्ये निपाह या विषाणूजन्य ( Nipah Virus) आजाराने दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता राज्य सरकारनेही यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व महापालिका, तसेच जिल्हा रुग्णालयांना अशा प्रकारच्या आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय नियमावलीचे पालन करून वैद्यकीय उपचार, नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात असे आरोग्यसेवा संचालनालयाने सूचित केले आहे.
निपाह संसर्गाने केरळमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असला, तरी या आजाराचा राज्यात फारसा धोका संभवत नाही; तरीही राज्यातही सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे सरकारच्या वतीने सूचित करण्यात आले आहे. निपाहसदृश आजाराचे सर्वेक्षण सर्व स्तरांवर होणे गरजेचे आहे, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
या विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने वटवाघळाच्या मार्फत होतो. वटवाघळाने अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने किंवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर किंवा इतर पाळीव प्राण्यांनाही या आजाराची लागण होऊ शकते. निपाहची लागण माणसापासून माणसाला होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांनाही लागण होऊ शकते. वटवाघळाच्या स्रावामुळे दूषित झालेल्या खजुराच्या झाडाचा रस प्यायल्यानेही या विषाणूचा प्रसार होतो.
(हेही वाचा : Talathi Bharti : ४४६६ तलाठी जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज; ३ टप्प्यांत परीक्षा; निकाल कधी ?)
ही आहेत लक्षणे
ज्या रुग्णाला ताप, डोकेदुखी, फार झोप येणे, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे असलेला कोणताही रुग्ण, तसेच जपानी मेंदूज्वर अथवा इतर मेंदूज्वरासाठी निगेटिव्ह असणे, त्याचप्रमाणे मागील तीन आठवड्यांत निपाबाधित भागांमध्ये विशेषतः केरळ, ईशान्य भारत अथवा बांगलादेश सीमेलगतच्या भागातील प्रवासाचा इतिहास असणे. अशा वर्णनाच्या कोणत्याही रुग्णास, संशयितास निपा रुग्ण म्हणून गृहीत धरावे. असा रुग्ण आढळल्यास या रुग्णास विलगीकरण कक्षात भरती करावे, त्याचा नमुना पुणे येथील एनआयव्ही येथे पाठवण्यात यावा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community