Gauri Ganpati 2023 : गौरी – महालक्ष्मी नावाप्रमाणेच प्रांतानुसार बदलतात नैवेद्यांच्या पद्धती

396
Gauri Ganpati २०२३ : गौरी - महालक्ष्मी नावाप्रमाणेच प्रांतानुसार बदलतात नैवेद्यांच्या पद्धती
Gauri Ganpati २०२३ : गौरी - महालक्ष्मी नावाप्रमाणेच प्रांतानुसार बदलतात नैवेद्यांच्या पद्धती

अतिथी देवो भव!’ असं सांगणारी आपली संस्कृती… आणि त्याप्रमाणे आनंदाने आचरण करणारी आपली माणसं… इथे तर साक्षात जगत्जननी गौरी, पाहुणी म्हणून नाही तर लेक बनून ‘माहेरपणा’ला आलेली… मग घराघरांत उत्साहाला उधाण न येईल तरच नवल! (Gauri-Ganpati 2023)
सुंदर, साजिऱ्या श्रावणमासानंतर भाद्रपद मास येतो… अन् हिरवाईच्या मखमली दुलईत विसावलेला भोवतालचा निसर्ग, सासरी रमलेल्या गौराईच्या मनात माहेरची ओढ जागी करतो. सप्तमीला अनुराधा नक्षत्रात महालक्ष्मीचे आगमन होते. असे मानले जाते, की महालक्ष्मी आपल्या मुलांसह ज्येष्ठ-कनिष्ठ रूपात तीन दिवस तिच्या माहेरी येते. घटस्थापनेनंतर पहिल्या दिवशी विवाहित महिला एकत्र येतात. दुसऱ्या दिवशी महानैवेद्य लावला जातो. यात १६ प्रकारचे गोड पदार्थ, १६ प्रकारच्या भाज्या आणि विविध प्रसादांचा समावेश आहे. तिसर्‍या दिवशी त्यांना सुख आणि समृद्धीची शुभेच्छा देऊन निरोप दिला जातो.झिम्मा फुगडीच्या आठवणी मनात गर्दी करतात. साक्षात् जगन्माता तिच्या घरी माहेरपणाला आलेली असते… हा तिच्यातल्या ‘मातृत्वा’चा जगत्जननीने केलेला सन्मान असतो.

माहेरवाशीण म्हणून बऱ्याच ठिकाणी पुजली जाणारी गौर, काही घरांत गणपतीची आई म्हणून येते ती आपल्या बाळाचं होणारं कौतुक डोळे भरून पाहण्यासाठी..! तर कधी ही जगन्माता ‘ज्येष्ठा-कनिष्ठा’ अशा बहिणींच्या रूपात आगमन करते… महाराष्ट्रात आणि कर्नाटकात भाद्रपद महिन्यात गणेशाच्या आगमनानंतर गौरीपूजनाची परंपरा आहे… ज्ञातीनुसार, प्रदेशानुसार पूजापध्दतीत फरक आहे मात्र कायम देवलोकात वास करणाऱ्या या लेकीबद्दलचा जिव्हाळा, आपुलकी सगळीकडे सारखी! ‘लेक’ बनून आलेल्या या माऊलीची ‘यथाशक्ती, यथामिलितं सेवा करणं,’ हाच भाव प्रत्येक गृहलक्ष्मीच्या मनी वसत असतो. महाराष्ट्रातही गौरीपूजनाची विविध रूपं पाहायला मिळतात… प्रदेशानुसार पूजेची पध्दत बदलते, गौरीचं रूप बदलतं आणि त्यानुसार नैवैद्याची पद्धतही बदलते.

कोकणस्थ आणि कऱ्हाडे ब्राह्मणांकडे खडयांच्या गौरी

सकाळी शुचिर्भूत होऊन, पंचोपचारी पूजेचं सामान बरोबर घेऊन नदीकाठी जायचं. तिथले गोलाकार, गुळगुळीत असे पाच किंवा सात खडे कोऱ्या वस्त्रावर ताम्हनांत किंवा चांदीच्या छोटया वाटीत ठेवायचे… त्यासोबत हळकुंड, सुपारी ठेवायची… खडयांना कापसाचं वस्त्र घालायचं, दूध-साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि ही गौर घरी आणायची. गौर माहेरवाशीण म्हणून येत असल्याने तिला घरी आणायचा मान माहेरवाशिणीचा किंवा कुमारिकेचा.कोकणस्थांमध्ये गौर घेऊन येणारीनं तोंडात पाण्याची चूळ ठेवायची असते .पाणवठयावरून वाजत-गाजत मिरवत आणलेल्या गौरीला घराच्या उंबऱ्याबाहेर पायावर दूध-पाणी घालून ओवाळलं जातं. घरात आतल्या दिशेने जाणारी रांगोळीची पावलं रेखलेली असतात, त्या पावलांवरून गौर आत येते… जागेवर स्थानापन्न होण्याआधी तिला प्रत्येक खोलीत नेऊन घरची गृहलक्ष्मी तिला घराच्या समृध्दीचं दर्शन घडवते… स्वयंपाकघर, पैशांची तिजोरी, दागदागिने, पुस्तकांचं कपाट, (आजच्या काळात अगदी कॉम्प्युटरही)दाखवते…’इथे काय आहे?’ असा प्रश्न तिला विचारते. यावर तिनं (मनातल्या मनात)’उदंड आहे’, असं त्रिवार उच्चारायचं… त्यानंतर गणपतीजवळ ठेवलेल्या आसनावर गौरींची स्थापना होते… मगच माहेरवाशीण तोंडातलं पाणी टाकून घरच्यांशी बोलू शकते.
आगमनाच्या दिवशी गौरीला खिरीचा नैवेद्य असतो… तर दुसऱ्या दिवशी घावन-घाटल्याचा नैवेद्य असतो… कऱ्हाडे ब्राह्मणांकडे दुसऱ्या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक असतो… गौरी घरी परतण्याच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी ओल्या नारळाच्या (मुरडीच्या) करंज्या केल्या जातात. तीनही दिवस गौरीची खण-नारळ अन् तांदळाने ओटी भरण्यात येते… निरोपाच्या वेळी तिच्यासोबत दही-पोहे दिले जातात…(लांबच्या प्रवासाला निघालेली माहेरवाशीण असते ना ती… ‘असं रिकाम्या हाती कसं पाठवायचं तिला?’ अशी भावना त्यामागे असते.) अक्षता टाकून तिला स्थानावरून हलविल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण घरातून तिला फिरविण्यात येतं… तिची कृपादृष्टी सगळीकडे फिरावी हा हेतू त्यामागे असतो.

देशस्थांची महालक्ष्मी
देशावर वैशिष्ट्यपूर्ण ‘कोथळ्या’ (भाजलेल्या मातीचा उभा साचा) किंवा आढणीचा (लोखंडाच्या तीन पायांवरील साचा) वापर करून ज्येष्ठा- कनिष्ठा साकारतात. कोथळ्या मातीच्या किंवा लोखंडाच्या असतात. काही ठिकाणी उभे दोन डबे, त्यावर चरव्या (छोट्या कळशा) आणि त्यावर महालक्ष्मीचे हात अशी रचना असते. शाडूचे मुखवटे, पितळेचे मुखवटे असे अनेक प्रकार दिसून येतात. प्रदेशानुसार त्यांचा फराळही बदलतो. महालक्ष्मींना साड्या नेसविणे, त्यांच्या निऱ्या छान घालता येणे जिकिरीचे आणि अर्थातच कौतुकास्पद मानले जाते. पुढच्या तीन दिवस हा उत्सव सुरू राहणार असल्याने त्याची तशीच स्थापना होणे महत्त्वाचे असते. ज्येष्ठा ही सोवळ्यात आणि कनिष्ठा ओवळ्यात असते. ज्येष्ठा कुटुंबातील ज्येष्ठ महिलेचा शालू घालून मिरवते आणि कनिष्ठा दरवर्षी नवी साडी घालून आपली हौसमौज करून घेते. जुन्या, नव्याचा संगम येथे दिसून येतो. गौरी येतात, त्या निमित्ताने भरजरी, जरतारी साड्या कपाटातून बाहेर येतात. हल्ली गौराईच्या दागिन्यांमध्येही पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम दिसतो. कंबरपट्टे, बाजूबंद, अंगठी, मंगळसूत्र, पुतळ्याची माळ, ठुशी, पाटल्या, बुगड्या अशा पारंपरिक नजाकतदार दागिन्यांबरोबरच आता खड्यांचे किंवा मोत्याचे आधुनिक दागिनेही पहायला मिळतात.

मराठा समाजाची हळदीची गौरी
मराठा समाजात हळदीचा खांब आणि गौरीचा मुखवटा घेऊन घरातल्या मुली अन् सवाष्णी विहिरीवर जातात. विहिरीच्या बाजूला सारवण करून रांगोळी काढतात, त्यावर मुखवटा अन् हळदीचा खांब ठेवून पूजा करतात… त्यानंतर वाजतगाजत गौर घरी आणतात… गणपतीजवळ तिची स्थापना करून तिला साडीचोळी नेसवली जाते, नटवलं जातं. तिच्या मागे हळदीचा खांब उभा केला जातो. या दिवसांत मिळणाऱ्या फुलोऱ्याचीही गौर म्हणून पूजा होते. पहिल्या दिवशी गौरीला तांदळाची भाकरी अन् भाजीचा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी गोडाचा… तिसऱ्या दिवशी हळदीच्या खांबाचं गणपतीसोबत विसर्जन केलं

कोळ्यांची गौरी
कोळी समाजात गौरींचा सण साजरा करण्याची प्रथा थोडी वेगळा आहे. तिथे भाद्रपद सप्तमीच्या दिवशी संध्याकाळी महिला तेरड्याच्या झाडाची फांदी गौरीच्या रुपाने घरी आणतात आणि गौरी इलो म्हणत तिचं स्वागत करतात. कौळी बांधव देवीला मच्छीचा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात. रात्रीच्या जागरणासाठी महिला कोळी परंपरे प्रमाणे साड्या नेसून पारंपारीक नृत्य करतात. अष्टमीच्या दिवशी महापूजा तर, नवमीला म्हणजे विर्जनाला पारंपारिक वेशभूषेत गौरी आणि शंकराची मिरवणूक काढतात. कोकणात ओवसा करतात. माहेरवाशिणी फळांचे सूप घेऊन गौरीची पूजा करते. काही ठिकाणी कुमारिका हि पूजा करतात. असे मानले जाते, कि महालक्ष्मी हि माहेरी येते, त्यामुळे हा सण माहेरवाशिणींचा सण मानला जातो.

New Project 2023 09 20T163351.044

विदर्भातील महालक्ष्मी
विदर्भात या सणाला महालक्ष्मींचा सण म्हंटले जाते. विदर्भात महालक्ष्मी समोर पाच धान्याच्या राशी घातल्या जातात. विदर्भातील महालक्ष्मीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे महालक्ष्मी बसल्यानंतर गोरक तयार केला जातो. हा गोरक तयार करण्यासाठी गाईचे शेण आणते जाते. नंतर त्याचा गोरख तयार केला जातो त्यावर दही दुध लोणी टाकल्या जाते. पुढे मग नदीवरून लव नावाची वनस्पती आणि नदीतील नऊ खडे आणले जातात ते तांब्याच्या कलक्षात ठेवुन त्यांची देखील पुजा केली जाते. महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी त्यांना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी या दिवसांमध्ये कांदा-लसूण खात नाहीत. त्यामुळे नैवेद्यातील सर्व पदार्थ कांदा-लसूण विरहीत बनवले जातात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच महालक्ष्मीं पूजनाच्या दिवशी पूजा करून महालक्ष्मींना पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासोबतच मोदक, करंज्या, सांजोऱ्या यांचा फुलोराबनविणे बनवला जातो. काही ठिकाणी हा फुलोरा महालक्ष्मीच्या वर बांधला जातो तर काही ठिकाणी तो महालक्ष्मींच्या साड्यांमध्ये कुठेतरी ठेवला वाजतो.

मराठवाड्यातील गौरी
मराठवाडा, खान्देश किंवा पश्चिम महाराष्ट्रातही साधारणपणे याच पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो. भाज्यांमध्ये, गोडाच्या पदार्थांमध्ये थोडा फरक असतो. अनेक ठिकाणी विविध गोड पदार्थ, फळं गौरींसमोर मांडली जातात. मराठवाड्यात साखरेची पुरणपोळी जास्त प्रमाणात केली जाते तर विदर्भात पुरणपोळीसाठी गुळाचा वापर केला जातो. गौरी विसर्जनाच्या दिवशी दही भात, मुरडीचे कानोले यांचा नैवेद्य दाखवला जातो.

कोकणातील गौरी
कोकणातील शेतकरीवर्गात गौरीचा सण महत्त्वाचा असतो. कोकणात या सणाला गौरी गणपतीचा सण असेच म्हंटले जाते. कोकणातल्या गौरींना पहिल्या दिवशी तांदळाची भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. तर दुसऱ्या दिवशी हळदीच्या पानातल्या पातोळ्या, भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. कोकणात नैवेद्यासाठी विशेष महत्वाचे असतात ते म्हणजे उकडीचे मोदक.कोकणातील काही कोळीवाड्यांमध्ये गौराईंना दुसऱ्या दिवशी तिखटाचाही नैवेद्य दाखवला जातो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा कोकणातील अनेक गावांमध्ये आजही जपली जाते. या तिखटाच्या नैवेद्यात मटण, चिकन, चिंबोऱ्या, मासे असे पदार्थ असतात. मात्र असा नैवेद्य केवळ काही ठिकाणीच जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.