Ganeshotsav 2023 : मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा दीड दिवसांच्या सर्वाधिक गणेश मूर्तींचे विसर्जन

यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आल्याने ही संख्या वाढलेली पहायला मिळत असली तरी भक्तांचा पूर्णपणे कल या तलावांकडे असल्याचे दिसून येत नाही.

159
GANESHOTSAV2023 : मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा दीड दिवसांच्या सर्वाधिक गणेश मूर्तींचे विसर्जन
GANESHOTSAV2023 : मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा दीड दिवसांच्या सर्वाधिक गणेश मूर्तींचे विसर्जन

सचिन धानजी

श्री गणरायांचे आगमन मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर बुधवारी २० सप्टेंबर दीड दिवसांच्या बाप्पांना भक्तांनी मनोभावे पुजा आर्चा करत निरोप देण्यात आला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत एकूण ६५ हजार ६८५ गणेश मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तसेच कृत्रिम तलावांमधील विसर्जन स्थळांवर पार पडले. मागील वर्षी दीड दिवसांच्या एकूण ६० हजार ४७३ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. तर मागील पाच वर्षांतील गणेशोत्सवामधील (Ganeshotsav 2023) दीड दिवसांमध्ये विसर्जन झालेल्या गणेश मूर्तींची संख्या पाहता यंदा सर्वाधिक ठरली आहे.

श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर बुधवारी दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला आहे. या दीड दिवसांच्या एकूण ६५ हजार ६८४ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले . यामध्ये ३३३ सार्वजनिक आणि ६५ हजार ३५१ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले.यामध्ये कृत्रिम तलावांमध्ये सार्वजनिक १६८ गणेश मूर्ती आणि २७ हजार २९० घरगुती गणेश मूर्तींचे अशाप्रकारे एकूण २७ हजार २९० मूर्तींचे विसर्जन पार पडले.कोविडपूर्वी अर्थातच २०१९मध्ये सर्वांधिक १ लाख ९६ हजार ४८३ सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यातील दीड दिवसांच्या एकूण ६१ हजार ९३० गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.

परंतु २०२० कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये संपूर्ण मुंबईत सार्वजनिक व घरगुती अशाप्रकारे एकूण १ लाख ३५ हजार ५१५ मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती, त्यातील दीड दिवसांच्या एकूण ४० हजार ८९५ मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. त्यानंतर कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर २०२१ मध्ये एकूण ७९ हजार ०९७ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती, त्यातील एकूण मूर्तींच्या तुलनेत दीड दिवसांच्या ६० ते ६५ टक्के मूर्तींचे अर्थात ४८ हजार ७१६ मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. त्यामुळे कोविड निर्बंध हटवण्यात आल्यानंतर प्रथमच मोकळ्या वातावरणात होणाऱ्या सन २०२२च्या गणेशोत्सवामध्ये अनेकांनी दीड दिवसांपेक्षा अधिक दिवस गणरायांचा मुक्काम अधिक वाढवण्यावर भर दिल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे मागील वर्षी एकूण विराजमान झालेल्या १ लाख ९३ हजार ०६२ गणेश मूर्तींपैंकी ६० हजार ४७३ गणेश मूर्तींचे विसर्जन करत भक्तांनी बाप्पांना निरोप दिला होता.

(हेही वाचा : MMRDA : मोनोरेलने घ्या गणेशदर्शन ,एमएमआरडीएचे नागरिकांना आवाहन)

कृत्रिम तलावांमध्ये यंदा सर्वाधिक मूर्ती विसर्जन

मुंबई महापालिकेच्यावतीने यंदा १९१ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून यासर्व ठिकाणी दीड दिवसांच्या एकूण २७ हजार २९० मूर्तींचे विसर्जन पार पडले. यामध्ये सार्वजनिक १६८ आणि घरगुती २७ हजार १२२ मूर्तींचा समावेश होता.मागील वर्षी म्हणजे सन २०२२मध्ये दीड दिवसांच्या सार्वजनिक १७२ आणि घरगुती २२,४१० गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले होते, तर त्या आधी म्हणजे सन २०२१मध्ये २८३ सार्वजनिक आणि २४,२७३ गणेश मूर्तींचे विर्सजन पार पडले होते, तर कोविडच्या लाटेमध्ये म्हणजे २०२२मध्ये ७१३ सार्वजनिक आणि २२, १७८ घरगुती गणेश मूर्तींच विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये झाले होते. यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात आल्याने ही संख्या वाढलेली पहायला मिळत असली तरी भक्तांचा पूर्णपणे कल या तलावांकडे असल्याचे दिसून येत नाही.

मागील पाच वर्षांमधील दीड दिवसांमधील गणेश मूर्ती विसर्जन आकडेवारी

२०२३ : दीड दिवसांमधील विसर्जन : ६५,६८४ मूर्ती

२०२२ : एकूण गणेश मूर्ती : १, ९३, ०६२, : दीड दिवसांमधील विसर्जन : ६०,४७३ मूर्ती
२०२१ : एकूण गणेश मूर्ती :७९,०९७, :दीड दिवसांमधील विसर्जन : ४८,७१६ मूर्ती
२०२० : एकूण गणेश मूर्ती :१,३५,५१५, : दीड दिवसांमधील विसर्जन : ४०,८९५ मूर्ती

२०१९ : एकूण गणेश मूर्ती :१,९६,४८३, : दीड दिवसांमधील विसर्जन : ६१,९३० मूर्ती

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.