मुंबई-पुण्यासह राज्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लोणावण्यात पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी ‘ग्लास स्कॉयवॉक’ उभारण्याचा सरकारचा मानस आहे. सुमारे १०० कोटी रुपयांच्या नियोजित लोणावळा पर्यटन विकास प्रकल्पाचा (Lonavala Tourism Development) आराखडा येत्या महिनाभरात तयार करून या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे वित्त व नियोजन विभागाचा कार्यभार सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात स्पष्ट केले.
(हेही वाचा – Women’s Reservation Bill : नारी शक्ती वंदन विधेयक राज्यसभेत एकमताने मंजूर )
पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथील पर्यटन विकास आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्याबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. लोणावळा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित आहे. ४.८४ हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येथे झीप लाइनिंगसारखे साहसी खेळ, फूड पार्क, ॲम्फी थिएटर, खुले जिम आणि विविध खेळ आदी सुविधा असणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेला उत्तम आराखडा महिनाभरात तयार करावा. पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे. या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षा आणि पर्यावरणाच्या जपणुकीला प्राधान्य द्यावे. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करताना काँक्रिटऐवजी दगडांचा वापर करावा. पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल, अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ, पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.
हेही पहा –