मावळ परिसरात कुसवली अर्थात कुसूर पठारावर विपुल निसर्गसंपदा असून, समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचावर असून, सुमारे १२०० एकर क्षेत्राच्या परिसराच्या या पठारावर जागतिक पर्यटन केंद्र निर्माण करावे. यासाठी कुसूर पठारावर जागतिक पर्यटन केंद्राचा जिल्हा आराखड्यात समावेश करावा,’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत.
पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कुसवली पठार निसर्गसंपदेसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे दुर्ग आणि निसर्गप्रेमींना या परिसराची भुरळ पडते. पर्यटन विकासाच्या दृष्टीने या परिसराच्या विकासासाठी बैठक घेण्यात आली. कुसवली पठार हे समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवर आहे. सुमारे एक हजार २०० एकरचा हा परिसर आहे. परिसराच्या एका बाजूस ठोकळवाडी, तर दुसऱ्या बाजूस वडीवळे आणि शिरोता अशी धरणे आहेत. पठाराच्या शेवटी पश्चिम घाट आहे.
(हेही वाचा – Asalfa Accident : असल्फा परिसरात भीषण अपघात, भरधाव कारने ३ ते ४ जणांना उडवलं )
मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र निर्माण करावे. मावळपासून नवी पनवेल आणि मुंबई कमी अंतरावर आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. त्या भागात निसर्गसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा. शासनामार्फत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित करावी, लवकरच याबाबत पुण्यात बैठक घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
कुसूर पठाराची वैशिष्ट्ये –
– कुसवली (कुसूर) पठार समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवर असून, साधारण एक हजार २०० एकरांचा हा परिसर आहे.
– निसर्ग सौंदर्याचा हा ठेवा पुणे, नवी मुंबई, पनवेल आणि मुंबईपासून अगदी जवळ आहे.
– कुसवली पठाराच्या परिसराच्या एका बाजूस ठोकळवाडी; तर दुसऱ्या बाजूस वडिवळे आणि शिरोता अशी धरणे आहेत. पठाराच्या शेवटी पश्चिम घाट आहे.
– कुसवली पठाराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी वास्तव्यास आहेत.
– पठारावर अंजन, करवंदे, आंबे व इतर विविध झाडांसह जांभळाची हजारो झाडे आहेत.
– भीमाशंकर अभयारण्य हे या पठारालाच लागून आहे.
रोजगारनिर्मिती शक्य
कुसवली पठाराचे पुण्यापासूनचे अंतर ८० किलोमीटर आणि मुंबईपासूनचे अंतर ९० किलोमीटर आहे. कुसवली हे जागतिक पर्यटनाचे केंद्र ठरतेय याचा आम्हाला आनंद आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी आभार मानते. या प्रकल्पामुळे आमच्या परिसरात रोजगार निर्मिती होईल.
– चंद्रभागा दाते, सरपंच, कुसवली, ता. मावळ
हेही पहा –
Join Our WhatsApp Community