संसदेचे दोन्ही सभागृहात महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) बहुमताने मंजूर करण्यात आलं. यादरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील महिलांना महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल महिलांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, येणाऱ्या अनेक पिढ्या या निर्णयाची चर्चा करतील. संपूर्ण देशाच्या नारीशक्तीला वंदन करून संसदेच्या दोन्ही सभागृहांत महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर झाल्याबद्दल शुभेच्छा देतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर वरिष्ठ सहकारी आणि देशातील महिलांनादेखील मी प्रणाम करतो. कधी-कधी एखाद्या निर्णयात देशाचे भाग्य बदलण्याची क्षमता असते. आज आपण सर्वजण अशाच एका निर्णयाचे साक्षीदार बनलो आहोत. संसदेच्या दोन्ही सभागृहात नारीशक्ती वंदन अधिनियम बहुमताने मंजूर झाले. ज्या गोष्टीची देशाला मागील अनेक दशकांपासून प्रतिक्षा होती, ते स्वप्न आता पूर्ण झालं आहे. हा संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा प्रसंग आहे. आज प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे आज कोटी-कोटी महिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं सौभाग्य भाजप पक्षाला मिळालं, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
(हेही वाचा – Women’s Reservation Bill : भाजप महिला कार्यकर्त्यांकडून पंतप्रधानांचं भव्य स्वागत, महिलांप्रती झुकून व्यक्त केला आदर)
नारीशक्ती वंदन अधिनियम हे विकसित भारताच्या निर्माणाकडे जाणारं मोठं पाऊल आहे. महिलांच्या जीवनाचा स्तर उंचवण्यासाठी महिलांच्या माध्यमातून विकासाचं नवं युग देशात आणण्याची खात्री देण्यात आली होती. हा प्रसंग म्हणजे त्याचं प्रत्यक्ष उदाहण आहे. देशातील प्रत्येक माता, मुली आणि बहिणी यांना हा नारीशक्ती वंदन अधिनियम मंजूर झाल्याबद्दल खूप शुभेच्छा देतो, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
नारीशक्ती वंदन विधेयक २०२३
महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी लोकसभेत मंगळवारी संमत झालेल्या ‘नारीशक्ती वंदन विधेयक २०२३’ ला राज्यसभेत सर्वसहमतीने मंजुरी देण्यात आली. विधेयकाच्या बाजूने २१५, तर विरोधात शून्य मते पडली. यामुळे महिलांना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community