विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत ८ हजार १०५ सार्वजनिक प्रसाधनगृहे असून या सर्व ठिकाणी पुन्हा स्वच्छता व निर्जंतुकीकरणाकडे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन खात्याने विशेष लक्ष दिले आहे. या सार्वजनिक प्रसाधनगृहांची दिवसातून ५ ते ६ वेळा स्वच्छता करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. (Swachh Mumbai Campaign)
कॉमेडी कोविड काळामध्ये अशाच प्रकारे झोपडपट्टी परिसरातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण हे दिवसातून पाच ते सहा वेळा केले जात होते. पण कोविड नंतर ही मोहीम पूर्णपणे थांबली होती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पुन्हा एकदा ही मोहीम सक्रियपणे राबवली जात असून प्रसाधनगृहातील ही स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण दिवसांतून पाच ते सहा वेळा करत असल्याचे पाहून झोपडपट्टीतील रहिवाशांच्या पुन्हा एकदा कोविड काळातील त्या आठवणी जागा झाल्या आहेत.
मुंबई प्रमुख परिसरांप्रमाणेच झोपडपट्टी आणि सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत. या अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन ) चंदा जाधव यांच्या सूचनेनुसार सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये आणि सर्व संबंधित खात्यांच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवली जात आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या व तत्सम वस्ती आहेत. या सर्व वसाहतींसह मुंबई महानगरात नागरिकांच्या सोयींसाठी सार्वजनिक प्रसाधनगृह बांधले आहेत. झोपडपट्ट्यांच्या परिसरात तसेच एकूणच सर्वत्र असलेल्या प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. स्वच्छते बरोबरच पावसाळयातील साथीचे आजार पसरू नयेत म्हणून धूर फवारणीही करण्यात येत आहे.
झोपडपट्टी बहुल भागामध्ये स्वच्छतेकरीता ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ (Swachh Mumbai Campaign) (वस्ती स्वच्छता योजना) संपूर्ण मुंबईमध्ये सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक संस्थांनी झोपडपट्टीवासियांना स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी करुन घेऊन स्वच्छतेबाबत नागरी शिस्त प्रस्थापित करणे, परिसर कायमस्वरुपी स्वच्छ ठेवणे हा उद्देश आहे. लोकसहभाग, लोकवर्गणी आणि महानगरपालिकेचे सहाय्य अनुदान या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर सार्वजनिक स्वच्छतेचे पालन करावे, असे आवाहनही महानगरपालिकेमार्फत केले जात आहे.
(हेही वाचा-Deonar : देवनार ६०० टेनामेंट पुनर्विकास : प्रकल्प ९ महिन्यानंतर कागदावरच, पण खर्च ३७२ कोटींनी वाढला)
उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव म्हणाल्या की, स्वच्छता मोहीमे अंतर्गत झोपडपट्ट्यांमधील प्रत्येक गल्लीसाठी स्वच्छता कर्मचारी – कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक भागात कचरा संकलन पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छता कर्मचारी दररोज सकाळी व सायंकाळी घरोघरी जाऊन घरातील कचरा नाल्यात अथवा सार्वजनिक रस्त्यावर न टाकता कचऱ्याच्या डब्यात टाका, असे आवाहन करत आहेत. त्यानंतर कचरा नाल्यात अथवा रस्त्यात टाकला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारादेखील देण्यात येत आहे.
मुंबईतील ८ हजार १०५ सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण याकडे विशेष लक्ष देऊन कार्यवाही करण्यात येत आहे. प्रसाधनगृह स्वच्छतेबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे फलक प्रसाधनगृहांच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. तसेच, ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ (Swachh Mumbai Campaign) अंतर्गत माहिती पत्रकांचे घरोघरी जाऊन वितरण करण्यात येत आहे.
रहिवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. या व्यतिरिक्त पथनाट्य, जनजागृती फेरी याचेही आयोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांच्या परिसरात असलेल्या सर्व व्यावसायिकांना, दुकानदारांना प्लास्टिकच्या पिशव्या न वापरण्याविषयी सूचना दिल्या जात आहे, असे उपायुक्त चंदा जाधव यांनी सांगितले आहे .
Join Our WhatsApp Community