विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबईत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहराला विद्रुप करणाऱ्या राजकीय बॅनरसहित (Banner Free Mumbai) इतर प्रकारच्या फलकांवरील कारवाईची मोहिम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यता आली आहे. मात्र, गणेशोत्सवामध्ये अनधिकृत बॅनर व फलक मोठ्याप्रमाणात लागलेले असून यासर्वांवरील कारवाईला अगदी खिळ बसलेली पहायला मिळत आहे. मागील २१ दिवसांमध्ये सुमारे ३५०० राजकीय बॅनर, फलक, पोस्टरसह इतर कमर्शियल आणि धार्मिक अशाप्रकारे एकूण मिळून सुमारे दहा हजार फलक व बॅनर हटवण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासन करत असला तरी मुंबईत एकही असा चौक नाही किंवा रस्ता नाही जिथे या राजकीय, धार्मिक आणि कमर्शियल बॅनर व फलकांसह पोस्टरचे दर्शन घडत नाही. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी नक्की यावर कारवाई करतात की कारवाईचे नाटक करता असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागील आठवड्यात माझगावसह वांद्रे पूर्व, कलिना सांताक्रुझ आणि अंधेरी आदी भागांमध्ये अस्वच्छता आणि अनधिकृत बॅनरबाजीमुळे बकाल होणाऱ्या मुंबईचे चित्र पाहून चिंता व्यक्त करत मुंबईत स्वच्छता राखली जावी आणि बॅनर (Banner Free Mumbai) काढले जावे अशाप्रकारचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी तातडीने परिपत्रक जारी करत सर्व विभागीय आयुक्त तसेच विभागीय उपायुक्त यांना बॅनर हटवून स्वच्छता मोहिम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी शनिवार रात्रीपासून बॅनर हटवण्याची मोहिम हाती घेण्याचे निर्देश दिले आहे.
या मोहिमेनंतर मुंबई महापालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने १ ते २१ सप्टेंबर या कालावधीमध्ये ३५६६ राजकीय, ६०८ कमर्शियल, ४९०० धार्मिक अशाप्रकारे एकूण ९८०० बॅनर, बोर्ड्स, पोस्टर आणि झेंड्यांवर कारवाई केल्याचा दावा केला आहे. मात्र महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार हे जाहिरात फलक उतरवण्याची मोहिम हाती घेतल्यानंतर काही प्रमाणात याची संख्या कमी झाली असली तर गोविंदाच्या काळात पुन्हा एकदा यांचे अधिक दर्शन घडू लागले.
परंतु गणेशोत्सवामध्ये भक्तांना शुभेच्छा देणारे फलक पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात झळकू लागले आहे. विशेष म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांनी हे जाहिरात फलक हटवण्याचे निर्देश दिले होते, त्याच मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा देणारे बॅनर व फलक लावले आहे. शिवसेनेसोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष ऍड आशिष शेलार यांची छायाचित्रे झळकणारे फलकही भाजपच्यावतीने प्रदर्शित करण्यात आली आहेत.
गणेशोत्सवामध्ये संपूर्ण मुंबई ही राजकीय बॅनर व फलकांमुळे झाकून गेली असून यामुळे मुंबईच्या सुशाभीकरणात या फलकांची भर पडून मुंबईतील विद्रुपतेचे दर्शन घडवले जात आहे. या फलक व बॅनरवर कारवाई (Banner Free Mumbai) करण्याची मूळ जबाबदारी ही परवाना विभागाची असली तरी महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार अशाप्रकारची कारवाई करण्याची जबाबदारी विभागीय उपायुक्त व विभागीय सहायक आयुक्त यांच्यावर सोपवली आहे.
आयुक्तांनी अशाप्रकारच्या बॅनर व फलकांवर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या उपायुक्त व सहायक आयुक्तांवर सोपवले असले तरी राजकीय पक्षांचे बॅनर व फलक हटवून आपण त्यांच्याशी वैमनस्य का घ्यावे याच विचाराने कोणत्याही विभागात ही कारवाई तीव्र केली जात नाही. परिणामी संपूर्ण मुंबई बॅनरमय (Banner Free Mumbai) झालेली आहे. विशेष म्हणजे राजकीय बॅनर व फलक प्रदर्शित करण्यास बंदी असून विरोधात एफआयआर दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश असतानही महापालिकेचे अधिकारी या कारवाईच्या शस्त्राचा वापर करण्यास कमी पडत आहे. त्यामुळे मुंबईला सुशाभित करण्याऐवजी राजकीय पक्षच आता मुंबईला विद्रुप करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याचे महापालिका अधिकारी समर्थन करत असल्याचेही दिसून येत आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community