गिरणी कामगारांच्या सुमारे पाच हजारपेक्षा जास्त घरांच्या आगामी लॉटरीसाठी म्हाडाने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ‘समन्वयक एजन्सी’ म्हणून नेमणूक केली आहे. त्यामध्ये म्हाडाच्या ३ हजार ८९४ आणि एमएमआरडीएच्या सुमारे १ हजार ६०० घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई बँकेने यापूर्वीही गिरणी कामगारांना सेवा दिली असून, यापुढेही ‘सर्वोत्तम सेवा’ पुरविली जाईल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
मुंबई बॅंकेचा गिरणी कामगारांना आधार
आगामी काळात म्हाडाकडून गिरणी कामगारांसाठी मोठी लॉटरी काढण्यात येत आहे. या लॉटरीची जबाबदारी म्हाडाने मुंबई बँकेवर समन्वयक एजन्सी म्हणून टाकली आहे. या नेमणुकीमुळे मुंबई बँकेने यापूर्वी गिरणी कामगारांना पुरविलेल्या उत्कृष्ट सेवेवर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईच्या जडणघडणीमध्ये गिरणी कामगारांचा मोलाचा वाटा आहे. पण सध्या गिरणी कामगार वयोवृद्ध असून, हलाखीचे जीवन जगत आहेत. या गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर, त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी कोणतीही राष्ट्रीयकृत किंवा खाजसी बँक पुढे आली नाही. तेव्हा मुंबई बँकेने सामाजिक बांधिलकी जपत खास गिरणी कामगारांसाठी कर्ज धोरण तयार केले. त्यामुळे आतापर्यंत ३ हजार ४२१ गिरणी कामगारांना २४० कोटींचे कर्ज वितरण करण्यात केले आहे, अशी माहिती आमदार प्रविण दरेकर यांनी दिली.
(हेही वाचाः आता देवेंद्र फडणवीस पवारांच्या भेटीला जाणार, भाजप-राष्ट्रवादी जवळीक वाढतेय?)
गिरणी कामगारांसाठी कर्ज नियम
बॅंक कोणतेही गृहकर्ज देताना, कर्ज घेणाऱ्यांची परतफेड क्षमता तपासून मगच कर्ज देते. पण गिरणी कामगार उध्वस्त आणि हलाखीचे आयुष्य जगत आहेत. त्यांच्याकडे वैयक्तिक उत्पन्नाचे साधन नाही. याचा विचार करुन म्हाडाचे मिळणारे घर भाड्यावर देऊन, त्या भाड्यातून कर्ज परतफेड करता येईल, अशी सवलत मुंबई बँकेने दिली. तसेच मुले किंवा जवळचे नातेवाईक यांना सहकर्जदार करुन, मुंबई बँकेने गिरणी कामगारांना म्हाडाचे घर मिळवून देण्यास मदत केली आहे, अशी माहितीही दरेकर यांनी दिली.
समन्वयक एजन्सीचे काम
गिरणी कामगारांच्या आगामी लॉटरीसाठी मुंबई बँकेची समन्वयक एजन्सी म्हणून नेमणूक केल्याचे पत्र म्हाडाने नुकतेच पाठवले आहे. त्यानुसार लॉटरी विजेत्या गिरणी कामगारांची सर्व कागदपत्रे मागवणे, अपात्र उमेदवारांना कळवणे, पात्र उमेदवारांची घराची रक्कम जमा करणे. आवश्यकतेनुसार गिरणी कामगारांना अर्थसहाय्य करणे. अशी कामे म्हाडाने घालून दिलेल्या अटी-शर्तींसह दिलेल्या कालावधीत मुंबई बँकेला पार पडायची आहेत.
Join Our WhatsApp Community
मुंबईच्या उभारणीत गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून मुंबई बँकेने हजारो गिरणी कामगारांना सवलतीच्या दराने गृहकर्ज दिले आहे. अटी-शर्ती शिथिल करुन त्यांना सरकारी योजनेतील हक्काचे घर मुंबईत मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. आता म्हाडाने नवी जबाबदारी दिली असून, मुंबई बँक गिरणी कामगारांना सर्वोत्तम आणि आपुलकीची सेवा नक्कीच पुरवेल.
– प्रवीण दरेकर, अध्यक्ष- मुंबई बँक