ऋजुता लुकतुके
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली एकदिवसीय कसोटी भारतीय संघाने पाच गडी राखून जिंकली. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड आणि सुर्यकुमार यादव यांची अर्धशतकं तसंच महम्मद शमीने टिपलेले पाच गडी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिलेलं २७७ धावांचं आव्हान भारतीय संघाने आठ चेंडू राखून पूर्ण केलं. या विजयासाह भारतीय संघाने दोन गोष्टी साध्य केल्या आहेत. (ICC ODI Ranking)
एकतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ अव्वल क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे टी-२०, एकदिवसीय तसंच कसोटी क्रमवारीत एकाच वेळी एखादा संघ अव्वल राहण्याची ही फक्त दुसरी वेळ आहे.
यापूर्वी, २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ही किमया केली होती. भारतीय संघाचे आता ११६ रेटिंग गुण झाले आहेत. त्यांनी ११५ गुणांवर असलेल्या पाकिस्तानला क्रमवारीत मागे टाकलं. तर ऑस्ट्रेलियन संघ १११ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही मालिका जिंकली तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होताना भारतीय संघ अव्वल संघ म्हणून स्पर्धेत सुरुवात करेल. ऑस्ट्रेलियन संघाची अव्वल क्रमांकाची संधी हुकली आहे. कारण, त्यासाठी त्यांना भारता विरुद्धच्या ताज्या मालिकेत ३-० ने विजय आवश्यक होता. पण, सध्या ते ०-१ ने पिछाडीवर आहेत. दुसरीकडे, पाक संघ स्वत: मधल्या काळात एकदिवसीय मालिका खेळणार नाहीए. पण, भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचे आगामी दोन्ही एकदिवसीय सामने गमावले, तर पाकिस्तान आपोआप अव्वल क्रमांकावर पोहोचतील.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धत मोहाली इथं आज (२२ सप्टेंबर) फलंदाजी आणि गोलंदाजीतही सरस खेळ केला. ऑस्ट्रेलियन संघाने पहिली फलंदाजी करताना २७६ धावा केल्या त्या डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक आणि त्याला स्टिव्ह स्मिथ आणि इंग्लिस यांनी दिलेल्या साथीमुळे. ४० षटकांपर्यंत ऑस्ट्रेलियन संघ तीनशेचा टप्पा सहज ओलांडेल असंच वाटत होतं. पण, महम्मद शामीने शेवटच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाला एकामागून धक्के दिले. आणि त्यामुळे ५० षटकांत ऑस्ट्रेलियन संघाने २७६ धावा केल्या. आणि या धावसंख्येला उत्तर देताना भारताच्या पहिल्या ६ फलंदाजांपैकी चार जणांनी अर्धशतक ठोकलं. ऋतुराज आणि शुभमन या सलामीच्या जोडीने तर १४१ धावांची सलामी संघाला करून दिली. आणि त्यानंतर के एल राहुल, सुर्यकुमार यादव तसंच इशान किशनने आपापली कामगिरी चोख बजावली आणि भारतीय विजय साकारला.
हेही पहा –