- ऋजुता लुकतुके
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची बक्षिसाची रक्कम आयसीसीने (ICC ODI World Cup 2023) जाहीर केली आहे. आणि विजेत्याला चक्क ४० लाख अमेरिकन डॉलर इतकी घसघशीत रक्कम मिळणार आहे. पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातील विजेत्या संघाला ४० लाख अमेरिकन डॉलर इतकी रक्कम मिळणार आहे. तर एकूण बक्षिसाची रक्कमही १०० लाख अमेरिकन डॉलर इतकी घसघशीत आहे. आयसीसीने शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे.
उपविजेत्या संघाला २० लाख अमेरिकन डॉलर मिळतील. अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. स्पर्धेचे साखळी सामने राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येतील. आणि अव्वल चार संघ उपान्त्य फेरीत पोहोचतील.
साखळी सामन्यांमध्ये विजय मिळवणाऱ्या संघांनाही बक्षिस मिळणार आहे. साखळीतील प्रत्येक विजयासाठी संघाला ४०,००० अमेरिकन डॉलर मिळतील. याशिवाय अंतिम चारमध्ये पोहोचलेल्या संघांव्यतिरिक्त उर्वरित सहा संघांना प्रोत्साहनपर १ लाख अमेरिकन डॉलर मिळतील.
(हेही वाचा – Black Raisins Benefits : काळ्या मनुका खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा सविस्तर)
या विश्वचषकापासून आयसीसीने आणखी एक लक्षणीय पद्धत सुरू केली आहे. पुरुष आणि महिलांच्या विश्वचषकासाठी बक्षिसाची रक्कम एकसमान असेल. महिलांचा विश्वचषक २०२५ मध्ये होणार आहे. आणि त्या स्पर्धेसाठी पुरुषांच्या आताच्या स्पर्धेइतकीच बक्षिसाची रक्कम असेल. आयसीसीच्या जोहानसबर्ग इथं झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जुलै महिन्यात हा निर्णय घेण्यात आला होता.
७ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरदरम्यान भारतात रंगणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाकडे यजमानपद असल्यामुळे संघ आपोआप स्पर्धेसाठी पात्र ठरला. तर न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ सुपर लीगमधून मुख्य स्पर्धेत पोहोचले. तर श्रीलंका आणि नेदरलँड्सला पात्रता स्पर्धेतून जावं लागलं. यंदा पहिल्यांदा वेस्ट इंडिज संघ स्पर्धेसाठी पात्र होऊ शकला नाही.
हेही पहा –