Indian Athletes Denied Visa : अरुणाचल प्रदेशची वुशू खेळाडू झाली बेपत्ता

आशियाई क्रीडास्पर्धेसाठी निवड झालेल्या तीन भारतीय खेळाडूंना चिनी सरकारने व्हिसा नाकारला आहे.

124
Indian Athletes Denied Visa : अरुणाचल प्रदेशची वुशू खेळाडू झाली बेपत्ता
Indian Athletes Denied Visa : अरुणाचल प्रदेशची वुशू खेळाडू झाली बेपत्ता
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या तीन खेळाडूंना चिनी सरकारने व्हिसा नाकारला होता. पैकी एक महिला खेळाडू धक्क्यातून सावरलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे ती गायब झाली आहे. भारताची वुशू खेळाडू मेपुंग लामगू चीनने व्हिसा नाकारल्यानंतर चक्क बेपत्ता झाली आहे. तिच्या कुटुंबीयांशी तिने मागचे दोन दिवस संपर्क केलेला नाही आणि तिचा फोनही लागत नाहीए. आशियाई क्रीडास्पर्धेसाठी निवड झालेल्या तीन भारतीय खेळाडूंना चिनी सरकारने व्हिसा नाकारला आहे. हे तीनही खेळाडू अरुणाचल प्रदेशचे आहेत. आणि अलीकडेच अरुणाचल प्रदेशच्या काही भागावर चीनने आपला हक्क सांगितला आहे.

त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या भारतीय खेळाडूंना व्हिसाही नाकारले. यातली २० वर्षीय वुशू खेळाडू मेपुंग या धक्क्यामुळे निराश झाली आहे. अशा मानसिक अवस्थेत तिने टोकाचं पाऊल उचलू नये अशी प्रार्थना आता तिच्या घरचे करत आहेत. मेपुंगचा भाऊ गांधी लामगू इटानगरमध्ये वैद्यकीय सेवा करतो. त्यानेही मेपुंगशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ‘तिचा व्हिसा गुरुवारी नाकारण्यात आला तेव्हा तिच्याशी शेवटचं बोललो होतो. ती खूपच रडत होती. पण, त्यानंतर ती माझाही फोन उचलत नाहीए. तिच्याशी संपर्कच होत नाहीए. तिने वाकडं तिकडं काही करू नये एवढीच इच्छा आहे,’ असं गांधी लागमूने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

(हेही वाचा – Police Inspector Suspended : आजारपणाचे कारण सांगून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई)

लामगू कुटुंबीय इटानगर पासून २०० किलोमीटर लांब आणि आडवळणावर असलेल्या सेपा या खेड्यात राहतात. तिथे मूळातच संपर्काची साधनं कमी आहेत. गांधी लामगूने घाबरून आपली बहीण बेपत्ता असल्याची गोष्ट आपल्या आई-वडिलांनाही सांगितलेली नाही. गांधी लामगूनेच आपली बहीण मेपुंगला वुशू खेळाची ओळख करून दिली. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ती पोहोचावी म्हणून तिला मदतही केली. दोघं इटानगरला राहतात. मेपुंग बरोबरच ओनेलू तेगा आणि निमन वांगसू या दोघा वुशू खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली होती. पण, या तिघींना चीनने व्हिसा नाकारला.

यापूर्वी, चेंगडू इथं झालेल्या जागतिक विद्यापीठ स्तरावरील खेळांमध्येही अरुणाचल प्रदेशच्या खेळाडूंना चीनने अशीच वागणूक दिली होती. तेव्हा भारताच्या अख्ख्या संघाने स्पर्धेतून माघार घेतली होती. आताही क्रीडाराज्यमंत्री अनुराग ठाकूर या घटनेच्या निषेधार्थ स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार नाहीत. तीन वुशू खेळाडूंचं मात्र यामुळे नुकसान झालं आहे. मेपुंगची मानसिक अवस्था सांगताना तिचा भाऊ गांधी म्हणाला, ‘ती कठीण मानसिक अवस्थेतून जात आहे. गुरुवारी फोनवर ती फक्त रडत होती. त्यानंतर मी तिला काही व्हाॅट्सॲप संदेशही पाठवले. पण, तिला सावरायला वेळ लागेल. आधी ती पुन्हा संपर्कात येऊदे.’ मेपुंग भारताची आघाडीची वुशू खेळाडू आहे. २०१६ पर्यंत ज्युनिअर गटात खेळणाऱ्या मेपुंगने जागतिक वुशू विजेतेपदही पटकावलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.