-
ऋजुता लुकतुके
चीनने आशियाई क्रीडास्पर्धेसाठी होआंगझाओला जाणाऱ्या तीन भारतीय वुशू ॲथलीट्सना व्हिसा नाकारला. त्यानंतर क्रीडाराज्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘अरुणाचल प्रदेशच्या तीन ॲथलीटना चीनने व्हिसा नाकारला, या कारणावरूनच आपण आशियाई क्रीडास्पर्धांसाठी गेलो नाही,’ असं क्रीडाराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी (२३ सप्टेंबर) स्पष्ट केलं. निमन वांगसू, ओनिलू तेगा आणि मेपुंग लामगू या तिघा ॲथलीटना चीनने व्हिसा दिला नाही. त्यामुळे वुशू संघाबरोबर त्यांना स्पर्धेसाठी चीनला जाता आलं नाही.
त्यानंतर अरुणाचल प्रदेशच्याच मुद्द्यावरून आपण चीनला गेलो नाही, असं ठाकूर यांनी सांगितलं आहे. ‘चीनने अरुणाचल प्रदेशच्या तीन ॲथलीटना व्हिसा नाकारला. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच मी देखील चीनला उद्घाटन समारंभासाठी न जाण्याचा निर्णय घेतला,’ असं अनुराग ठाकूर कोइंबतूर इथं एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही आपल्या गुरुवारच्या पत्रकार परिषदेत भारताची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना हेच सांगितलं होतं, ‘माहिती तंत्रज्ञान आणि क्रीडा राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला चीनचा दौरा रद्द केला आहे. चीनने भारताप्रती केलेली आगळीक हेच त्यामागचं कारण आहे. आणि देशाचं हित जपण्यासाठी भारतीय सरकार याविषयी काही निर्णय घेऊ शकतं,’ असं बागची यावेळी म्हणाले होते.
(हेही वाचा – Fire In Train : गुजरातमधील वलसाडमध्ये हमसफर एक्सप्रेसला आग)
पुढे बागची यांनी काही भारतीय खेळाडूंना सापत्नपणाची वागणूक मिळाल्याची आरोप चीन सरकारवर केला होता. ‘काही भारतीय खेळाडूंना त्यांचं मूळ गाव किंवा वेगळ्या वंशामुळे चीनकडून वेगळी वागणूक मिळाली आहे. आणि या गोष्टीचा भारत निषेध करतो. सगळ्या भारतीयांना बाहेर एकसारखी वागणूक मिळावी, हीच भारताची याविषयीची भूमिका आहे. आणि अरुणाचल प्रदेश बद्दल बोलायचं झालं तर हा प्रदेश आधी, आता आणि इथून पुढेही भारताचाच भाग राहील,’ असं बागची यांनी ठणकावून सांगितलं. ज्या तीन खेळाडूंना चीनने व्हिसा नाकारला त्यातलीच एक खेळाडू मेपुंग लामगू या धक्क्याने निराश झाली आहे. तिने शुक्रवारपासून अगदी आपल्या कुटुंबीयांशीही संपर्क तोडला आहे आणि ती बेपत्ता आहे. तीन भारतीय खेळाडूंची आशियाई क्रीडास्पर्धेत भाग घेण्याची संधी चीनच्या या निर्णयामुळे मुकणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community