विशेष प्रतिनिधी,मुंबई
गणपती बाप्पा मोरया, (Ganapati Bappa Morya) पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत ढोल ताशांचा गजरात शनिवारी गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पावसाची रिमझिम सुरू असतानाही त्यात भिजत, ढोलताशांचा तालावर नाचत भक्तांनी बाप्पाचा निरोप घेताना पुढच्या वर्षी लवकर येण्याची आर्जवी केली. मात्र, पाच दिवसांचे गणपती आणि गौरी गणपती मूर्तीचे विसर्जन एकाच दिवशी आल्याने भाविकांची रस्त्यावर अधिक गर्दी होईल असे वाटत असताना शनिवारी घराशेजारी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिल्याने हे गर्दीचे प्रमाण दिसून आले नाही.
मागील पाच दिवसांचा लाडू,मोदकांसह पंचपंक्वांनांचा पाहुणचार घेत घराघरांत विराजमान झालेल्या बाप्पांनी तसेच माहेरवाशिण आलेल्या गौरीने शनिवारी निरोप घेतला. श्री गणरायाच्या आगमनापासून संततधार कोसळणाऱ्या पावसानेही गणेशोत्साच्या पाचव्या दिवशीही सकाळपासून हजेरी लावल्याने भक्तांना शनिवारी भिजतच गणपती बाप्पा मोरया, (Ganapati Bappa Morya) पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत बाप्पांना निरोप दिला. संततधार पावसातही भक्तांच्या भक्तीचा उत्साहालाही पारावर राहिलेला नव्हता आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देताना भिजतच नाचताना बेभान होऊ गेले होते.
(हेही वाचा-Siddhivinayak Trust : सिद्धीविनायक ट्रस्टच्या अधिकारी नंदा राऊत यांच्या जागी नवी नियुक्ती)
श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मुंबईत ७३ नैसर्गिक स्थळी गणेश मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय मुंबईतील विविध ठिकाणी १९१ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व विसर्जन स्थळांवर महापालिकेच्यावतीने गणेश भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. बुधवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन या सर्व विसर्जन स्थळांवर सुरळीत पार पडल्यानंतर शनिवारी पाच दिवसांच्या बाप्पांनी तसेच गौरी पंचपंक्वांनाच्या नैवेद्याचा आस्वादाचा पाहुणचार घेत निरोप घेतला. (Ganapati Bappa Morya)
शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंत एकूण ४४६१९ गणेश मूर्ती व गौरींचे विसर्जन पार पडले. त्यामध्ये सार्वजनिक ३०६, घरगुती ३९८९५ आणि गौरी ४४१८ आदी मूर्तींचा समावेश होता. तर मुंबईतील १९१ कृत्रिम तलावांच्या विसर्जन स्थळांवर १९०७९ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन पार पडले. त्यामध्ये सार्वजनिक १५३, घरगुती १७४५१ आणि गौरी १४७५ आदी गणेश मूर्तींचा समावेश होता. त्यामुळे एकूण गणेश मूर्ती विसर्जनाच्या सरासरी ४० ते ४२ टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यावर भाविकांचा भर होता,हे या आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे.
सायंकाळी सहावाजेपर्यंत गणेश मूर्ती विसर्जन
सार्वजनिक गणेश मूर्ती : ३०६
घरगुती गणेश मूर्ती : ३९,८९५
गौरी : ४४१८
एकूण मूर्ती : ४४६१९
कृत्रिम तलावातील गणेश मूर्ती
सार्वजनिक गणेश मूर्ती : १५३
घरगुती गणेश मूर्ती : १७४५१
गौरी : १४७५
एकूण मूर्ती : १९०७९