Congress VS Samajwadi Party : काँग्रेस-सपातील ‘सवती मत्सर’ चव्हाट्यावर

111
Congress VS Samajwadi Party : काँग्रेस-सपातील 'सवती मत्सर' चव्हाट्यावर
Congress VS Samajwadi Party : काँग्रेस-सपातील 'सवती मत्सर' चव्हाट्यावर
  • वंदना बर्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करून देशाची धुरा हाती घेण्याच्या स्वप्नात गुंग झालेल्या काँग्रेस पक्षाच्या पायाखालील जमीन ओढण्याची समाजवादी पक्ष योजना आखत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. थोडक्यात काय तर, राहुल गांधी यांच्या प्रयत्नांवर विरजण सोडण्यासाठी अखिलेश यादव आतुर झाल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे की, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आज म्हणजेच (सोमवार २५ सप्टेंबर) छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आहेत. ते येथे निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले आहेत. अर्थात, छत्तीसगडमध्ये काँग्रेस-सपा आघाडी नाही झाली तर दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आपले उमेदवार मैदानात उतरवतील.

काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकमेकांना हरविण्यासाठी मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी जीवाचे रान करून २०२४ च्या निवडणुकीत देशाची सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव राहुल गांधी यांच्या प्रयत्नांवर विरजण सोडण्यास आतूर आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीमध्ये जागा वाटून घेतल्या जातील. परंतु, तत्पूर्वी, पाच राज्यांच्या निवडणुकीतही काँग्रेसने मित्र पक्षांना सोबत घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा करायला हवी, अशी भूमिका अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने घेतली आहे.

काँग्रेस आणि सपा या दोन्ही पक्षांतील नाराजीची दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेषत: यूपीतील घोसी आणि उत्तराखंडमधील बागेश्वरच्या पोटनिवडणूक निकालानंतर ही दरी आणखी वाढली आहे. सपा आता छत्तीसगडमध्ये निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे. छत्तीसगडमध्ये सपाने २००३ च्या निवडणुकीत तब्बल ५२ उमेदवारांन मैदानात उतरविले होते. तर, यापूर्वीच्या निवडणुकीत फक्त १७ उमेदवारांना तिकीट दिले होते. आता अखिलेश यादव पुन्हा या राज्यांत सक्रीय झाले आहेत.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस सपा आघाडी नाही होऊ शकली तर सपा काँग्रेसच्या विरोधात आपले उमदेवार उतरविल्याशिवाय राहणार नाही, असे चित्र तयार झाले आहे. अखिलेश यादव एवढ्यावरच थांबणार नाही आहेत तर येत्या बुधवारी म्हणजे परवा दि. २७ सप्टेबर रोजी अखिलेश यादव यांची मध्यप्रदेशच्या रीवा येथे निवडणूक सभा होणार आहे. सपाने मध्यप्रदेशात सहा उमेदवारांची घोषणा केली आहे. आणखी उमेदवार उतरविण्याची तयारी आहे. २००३ मध्ये सपाचे सात आमदार निवडून आले होते आणि गेल्या निवडणुकीत सपाचा एक आमदार निवडून आला होता.

अखिलेश यादव राजस्थानमध्ये सुध्दा राहुल गांधी यांना चारी मुंड्या चीत करण्यासाठी आतूर आहेत. सपाने राजस्थानमध्ये मागच्या निवडणुकीत सात जागांवर उमेदवार उतरविले होते. मात्र, एकही जागा जिंकली नाही. परंतु, सपाला ७.५६ टक्के मते मिळाली होती. थोडक्यात, सपाने राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. या राज्यांत काँग्रेसने सपासाठी काही जागा सोडायला पाहिजे, अशी यादव यांची इच्छा आहे. मात्र, काँग्रेस या मुद्यावर काहीही बोलायला तयार नाही.

(हेही वाचा – Indian Railways : भारतीय रेल्वेने एका नियमामुळे कमावले २८०० कोटी; काय आहे तो नियम?)

यामुळे, सपाने काँग्रेसवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस जसा व्यवहार मित्र पक्षांशी करेल त्याची परतफेड लोकसभेच्या निवडणुकीत उत्तरप्रदेशात केली जाईल, अशी सरसकट ताकिद सपाकडून दिली जात आहे. अर्थात, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्याला डोळा दाखविला तर लोकसभेच्या निवडणुकीत सपा आपला डोळा दाखविल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे.

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासठी देशातील २८ पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या नावाखाली एकजूट झाले आहेत. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जेवढे जास्त दबावात घेता येईल तेवढे जास्त घेण्याचा प्रयत्न मित्र पक्षांकडून सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पुढाकाराने काँग्रेससह २८ पक्षांची ‘इंडिया’ नावाची आघाडी अस्तित्वात आली असली तरी; या आघाडीतील घटक पक्षांमध्ये सवती मत्सर उफाळून आला असल्याचे चित्र देशात बघायला मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.