BMC : अनंत चतुर्दशीसाठी महापालिकेची अशी जय्यत तयारी

121
BMC : अनंत चतुर्दशीसाठी महापालिकेची अशी जय्यत तयारी
BMC : अनंत चतुर्दशीसाठी महापालिकेची अशी जय्यत तयारी

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. गुरुवारी २८ सप्टेंबर २०२३ रोजी अनंत चतुर्दशी दिनी होणाऱ्या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुमारे १० हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण १९८ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.

New Project 65 1

उप आयुक्त बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मागील दोन महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू आहे. श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किनाऱ्यांवर ४६८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४६ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ७६४ जीवरक्षकांसह ४८ मोटरबोटी तैनात केल्या आहेत. विसर्जनापूर्वी भाविकांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी १५० निर्माल्य कलशांसह २८२ निर्माल्य वाहनांचीही सोय करण्यात आली आहे.

New Project 67 1

(हेही वाचा – President Draupadi Murmu : भारताला सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र बनवणे हे अधिकाऱ्यांचे सामूहिक ध्येय – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू)

महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने ६० निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. विविध ठिकाणी ६८ स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६१ रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’ च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे १,०८३ फ्लडलाईट आणि २७ सर्चलाईट लावले आहेत.

New Project 66

विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी १२१ फिरती प्रसाधनगृहं सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहीत प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत. श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना सुविधा व्हावी, विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होऊ नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर मूर्ती विसर्जन वेळ नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा विकसित केली आहे. मायबीएमसी व्हॉट्सअप चॅटबॉट (MyBMC WhatsApp Chatbot) या ८९९९-२२-८९९९ क्रमांकावरील चॅटबॉटमध्ये यंदा आपल्या नजीकचे गणेश मंडळ व मूर्ती विसर्जनस्थळ शोधण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.