ICC ODI World Cup : पाक संघाला अखेर निघण्याच्या दोन दिवस आधी मिळाला भारतीय व्हिसा

पाकिस्तानचा संघ येत्या बुधवारी एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात येणार आहे. आणि भारतीय प्रशासन खेळाडूंना वेळेत व्हिसा देत नसल्याची तक्रार त्यांनी आयसीसीकडे केली होती. पण, आता खेळाडूंना व्हिसा मिळाल्याचं आयसीसीनेच स्पष्ट केलं आहे

163
ICC ODI World Cup : पाक संघाला अखेर निघण्याच्या दोन दिवस आधी मिळाला भारतीय व्हिसा
ICC ODI World Cup : पाक संघाला अखेर निघण्याच्या दोन दिवस आधी मिळाला भारतीय व्हिसा

ऋजुता लुकतुके

एकदिवसीय विश्वचषकासाठी (ICC ODI World Cup) भारतात येणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट संघाला अखेर सोमवारी उशिरा (२५ सप्टेंबर) भारतीय व्हिसा मिळाल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं स्पष्ट केलं आहे. २७ सप्टेंबरच्या सकाळी पाक संघ भारतात हैद्राबाद इथं येणार आहे. कारण, २९ तारखेला त्यांचा पहिला सराव सामना होणार आहे. पण, भारतात निघण्यासाठी दोन दिवस शिल्लक असतानाही भारतीय प्रशासनाने पाक खेळाडूंना व्हिसा दिला नाही, अशी तक्रार पाकिस्तानने आयसीसीला केली होती.

आता अखेर पाक खेळाडूंना व्हिसा मिळालेला असून २७ तारखेला ठरल्याप्रमाणे ते हैद्राबादला पोहोचतील, असं आयसीसीने पीटीआय वृत्तसंस्थेकडे स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण होतं. पाक क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते उमर फारुख यांनी पीटीआयशी बोलताना व्हिसा अजून मिळाला नसल्याचं म्हटलं आहे. ‘आमचा प्रतिनिधी भारतीय दूतावासात बसलेला आहे. पण, तिथून व्हिसा प्रक्रिया पूर्ण झाल्याचं आम्हाला कळवलेलं नाही,’ असं फारुख पीटीआयशी बोलताना म्हणाले.

आयसीसीने आज व्हिसाविषयी स्पष्टीकरण दिलं कारण, पाकिस्तानने यापूर्वी आयसीसीचे कार्यकारी अध्यक्ष जेफ ॲलरडाईस यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. पाकिस्तानी संघ २७ तारखेला भारतात पोहोचण्यापूर्वी २ दिवस दुबईत मुक्काम करणार होता. पण, भारतीय व्हिसाविषयीची अनिश्तितता पाहून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

भारताने व्हिसा देण्यात दिरंगाई केल्याचा आरोप पाकिस्तानने आयसीसीकडे केला आहे. ‘भारताने मागची तीन वर्षं पाकिस्तानी खेळाडू, पत्रकार, क्रीडा रसिक अशा सगळ्यांचीच अशी प्रतारणा केलेली आहे. आता तर एकदिवसीय विश्वचषकासारख्या (ICC ODI World Cup) महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी अशी वागणूक मिळाल्यामुळे पाकिस्तानी खेळाडू दुखावले गेले आहेत. आणि त्यांच्या स्पर्धेच्या तयारीलाही धक्का बसला आहे,’ अशी तक्रार पाक मंडळाने आयसीसीकडे पत्र लिहून केली आहे.

(हेही वाचा-Monsoon Update : मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात? जाणून घ्या काय हवामान खात्याचा अंदाज)

पाकिस्तानचे १५ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मिळून एकूण ३५ जण भारतात अधिकृतपणे येणार आहेत. पण, व्हिसाच्या दिरंगाईमुळे कार्यक्रम बदलावा लागला. आणि त्यात ३५ तिकिटं रद्द करून नव्याने काढल्याची तक्रारही पाक मंडळाने केली आहे.

आंतरराष्ट्रीय संबंध ताणलेले असल्यामुळे भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांच्या देशांचा क्रिकेट दौरा सध्या करत नाहीएत. २०१६ मध्ये पाक संघ शेवटचा भारत दौऱ्यावर आला होता. त्यानंतर आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषक अशा दोनच प्रकारच्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघ आमने सामने येतात.

आताही विश्वचषक स्पर्धाच (ICC ODI World Cup) भारतात होत असल्यामुळे पाक मंडळाची पंचाईत झाली होती. नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानमध्ये जायला नकार दिला होता. त्यामुळे भारत – पाक सामना श्रीलंकेत खेळवण्यात आला होता. त्यापूर्वीच पाकिस्ताननेही भारतात खेळण्यासाठी नाराजी दाखवली होती. पण, अख्खी स्पर्धाच भारतात होत असल्यामुळे पुढे पाक मंडळाने आपला न खेळण्याचा निर्णयही मागे घेतला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.