मुंबईत येत्या गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी आरे वसाहत परिसरात पुरेशी विसर्जन व्यवस्था नसल्याने गणेश भक्तांची विसर्जनासाठी मोठी गैरसोय होत आहे. मात्र, याबाबतीत आता न्यायालयाने कृत्रिम तलाव उभारणीस परवानगी देताना सदर बाबत निर्णय अध्यक्ष, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नियंत्रण समिती यांनी घ्यावा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे न्यायालयीन आदेशानुसार गोरेगांव आरे वसाहत येथे कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याची मागणी भाजपने महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.
भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी लिहिलेल्या दरवर्षी आरे वसाहतीमधील तीन मोठे तलाव आणि कृत्रिम तलाव या मध्ये विसर्जन होते. परंतु न्यायालयीन आदेशानुसार यावर्षी आरे वसाहती मधील तीनही तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जनासाठी मनाई करण्यात आली. त्यामुळे महापालिकेने कृत्रिम तलाव उभारण्यासाठी कार्यकारी अधिकारी, आरे वसाहत यांच्याकडे परवानगी मागीतली होती. त्यांनी परवानगी फेटाळल्यामुळे या निर्णयाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. यावर निर्णय देताना न्यायालयाने कृत्रिम तलाव उभारणीस परवानगी देताना सदर बाबत निर्णय अध्यक्ष, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र नियंत्रण समिती यांनी घ्यावा असे निर्देश दिले आहेत.
(हेही वाचा – Coriander expensive: पावसामुळे कोथिंबीर महागली, एका जुडीसाठी मोजावे लागतात ‘एवढे’ पैसे)
दरवर्षी आरे कॉलनी गोरेगांव येथे गोरेगांव (पूर्व-पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व), अंधेरी (पूर्व), मालाड (पूर्व) या भागातील गणेश मूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. गेल्या वर्षी ३४३१ (३१०५ घरगुती गणेश मूर्ती अधिक ३२६ सार्वजनिक गणेश मूर्ती) गणेश मूर्तींचे विसर्जन आरे वसाहतीतील तीन नैसर्गिक तलाव आणि सात कृत्रिम तलावांमध्ये झाले होते. गेल्या वर्षी अनंत चतुर्दशी दिवशी ६९७ घरगुती व २०१ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. यावर्षी येथे एकमात्र कृत्रिम तलाव उपलब्ध आहे आणि सहा वाहनारूढ छोटे कृत्रिम तलाव उपलब्ध आहेत.
ही व्यवस्था गणेश विसर्जनासाठी पुरेशी पडणार नाही. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल व विसर्जनास विलंब होईल असे सकृत दर्शनी वाटते. ही बाब लक्षात घेऊन न्यायालयीन निर्देशानुसार जास्तीत जास्त कृत्रिम तलाव तातडीने उभारणे आवश्यक आहे. याबाबत अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची सांख्यिकी माहिती घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन अतिरिक्त गणेश विसर्जन तलाव उभारण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
महापालिका म्हणते…
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरे तलाव येथे सर्व प्रकारच्या गणेश मुर्ती विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली आहे. तथापि, नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गणेश मूर्ती विसर्जनासाठी आरे तलाव येथे २ कृत्रिम तलावांची तर परिसरात ६ फिरत्या तलावांची उभारणी करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
उपायुक्त (परिमंडळ-४) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनानुसार ‘पी दक्षिण’ विभागाचे सहायक आयुक्त राजेश अक्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आरे तलाव येथे सर्व प्रकारच्या गणेश मुर्ती विसर्जनासाठी बंदी घातली आहे. तथापि, नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागाने आरे तलाव येथे २ कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. तसेच, पश्चिम द्रुतगती महामार्गालगत आरे रोड नाक्यावर ४ फिरते तलाव, पिकनिक स्पॉट जवळ २ फिरते तलाव यांची उभारणी केली आहे. श्री गणेश मंडळांना या ठिकाणी ४ फुटापर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन करता येईल. नागरिकांनी या कृत्रिम तलाव, फिरते तलाव या ठिकाणीच गणेश मूर्ती विसर्जित कराव्यात, असे आवाहनही राजेश अक्रे यांनी केले आहे.
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=TvLX_aH5ADo
Join Our WhatsApp Community