Ind vs Aus ODI Series : भारताला खुणावतोय ‘हा’ विक्रम

158
Ind vs Aus ODI Series : भारताला खुणावतोय ‘हा’ विक्रम
Ind vs Aus ODI Series : भारताला खुणावतोय ‘हा’ विक्रम
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा तिसरा एकदिवसीय सामना २७ तारखेला ४ वाजता होणार आहे. भारतीय संघाला मालिका ३-० ने जिंकण्याची संधी आहेच. शिवाय एक अनोखा विक्रम ते आपल्या नावावर करू शकतात. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाचे अनुभवी खेळाडू रोहीत शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा संघात परतले आहेत. आणि विश्वचषकापूर्वीचा शेवटचा अंतिम सामना असल्यामुळे तो हलक्यात घेणार नाही, असं कर्णधार रोहीत शर्माने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

खरंतर भारतीय कर्णधाराला ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक विक्रम खुणावतोय. यापूर्वी एकदाही भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला व्हाईटवॉश दिलेला नाही. आता मात्र तीनही एकदिवसीय सामने जिंकून मालिका ३-० ने जिंकण्याची संधी भारतीय संघासमोर आहे. खरंतर ऑस्ट्रेलियन संघालाही भारताविरुद्ध मालिकेतील सर्व एकदिवसीय सामने जिंकण्याची किमया यापूर्वी करता आलेली नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेच दोन संघ आगामी एकदिवसीय विश्वचषकात पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. म्हणजे विश्वचषकातील दोन्ही संघांचा पहिला सामना हा एकमेकांविरुद्धचा आहे. ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये हा सामना होणार आहे.

त्यामुळे भारतासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा सामना महत्त्वाचा आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताची फलंदाजीची फळी दुय्यम स्तराची होती. पण, तरीही शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव यांच्या धुवाधार कामगिरीमुळे दोन्ही सामन्यांमध्ये भारताला सहाच्या वर धावगती राखता आली. आणि आता तिसऱ्या सामन्यात रोहीत आणि विराटही संघात परतत आहेत. भारतीय संघात या घडीला रोहीत शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, सुर्यकुमार यादव, ईशान किशन, के एल राहुल तसंच श्रेयस अय्यर हे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज आहेत. यापैकी शुभमन गिलने तर यावर्षी पाच शतकं ठोकली आहेत. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यावर्षी हजार एकदिवसीय धावांचा टप्पा ओलांडलेला तो एकमेव फलंदाज आहे. त्याची सरासरीही ७२ धावा इतकी सरस आहे.

(हेही वाचा – BMC : मुंबईत यंदाही पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ प्रथम)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रेयस, सुर्यकुमार आणि लोकेश राहुल यांनाही लय सापडलीय. अनुभवी आणि अष्टपैलू हार्दिक पांड्याही संघात परतलाय. त्यामुळे भारतीय फलंदाजी आता मजबूत वाटतेय. तर जसप्रीत बुमरा, महम्मद शामी आणि सिराज यांची गोलंदाजीही प्रभावी ठरतेय. अक्षर पटेलची दुखापत हा थोडा चिंतेचा विषय असला तरी रवीचंद्रन अश्विनने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी केलीय आणि कुलदीप यादवही संघात परतलाय. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाची मदार कर्णधार पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कवर आहे. दोन वर्षांपूर्वी आताच्याच ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्धची भारतातील एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली होती. पण, यंदा त्याच ऑस्ट्रेलियन संघाला आपली छाप पाडता आलेली नाही. स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे फलंदाज चांगली सुरुवात करतायत. पण, त्यांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. आता त्यांना ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लेबुशेन यांच्यांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.