Tennis Hall of Fame : लिअँडर पेसचं मानाच्या टेनिस हॉल ऑफ फेमसाठी नामांकन 

भारताचा माजी टेनिसपटू लिअँडर पेसला टेनिसच्या मानाच्या हॉल ऑफ फेम पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. ही किमया करणारा आशियातील तो पहिला टेनिसपटू ठरला आहे

161
Tennis Hall of Fame : लिअँडर पेसचं मानाच्या टेनिस हॉल ऑफ फेमसाठी नामांकन 
Tennis Hall of Fame : लिअँडर पेसचं मानाच्या टेनिस हॉल ऑफ फेमसाठी नामांकन 

ऋजुता लुकतुके

भारताचा ज्येष्ठ टेनिसपटू आणि १८ दुहेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावणारा खेळाडू लिअँडर पेसने टेनिस हॉल ऑफ फेमसाठी (Tennis Hall of Fame) नामांकन मिळवलं आहे. २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यात पेसच्या बरोबरीने कॅरा ब्लॅक, ॲना इव्हानोविक, कार्लोस मोया, डॅनियल नेस्टर व फ्लाविया पेनेटा यांनाही नामांकन मिळालं आहे.

आशियातून हे नामांकन मिळवणारा पेस हा पहिला टेनिसपटू ठरला आहे. ५० वर्षीय पेसने आपल्या कारकीर्दीत दुहेरी आणि मिश्र दुहेरीतील मिळून १८ ग्रँडस्लॅम विजेतेपदं मिळवली आहेत. यातील ८ विजेतेपदं पुरुषांच्या दुहेरीतील आहेत. तर १० विजेतेपदं मिश्र दुहेरीतील आहेत. तब्बल ३० वर्षं पेस भारतासाठी आणि व्यावसायिक टेनिस खेळला. यात तब्बल ४६७ आठवडे तो दुहेरीच्या क्रमवारीत पहिल्या दहांत होता. आणि यातले ३७ आठवडे तो क्रमवारीत अव्वलही होता. एटीपी टूअरमध्ये त्याने ५५ दुहेरी विजेतेपदं मिळवली.

हॉल ऑफ फेममधील नामांकनानंतर लिअँडरने आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे. ‘दिग्गज खेळाडूंच्या मांदियाळीत माझं नामांकन झाल्यामुळे मी नक्कीच खुश आहे. हे नामांकन मिळवणारा मी पहिला आशियन खेळाडू आहे, ही गोष्टही समाधान देणारी आहे. माझे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि माझ्या पाठीशी सदैव असलेले भारतीय चाहते यांच्या जोरावरच मी इथंपर्यंत पोहोचू शकलो,’ असं पेसने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.

(हेही वाचा-Monsoon Update : मुंबई पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता , राज्यभरातही इतर जिल्ह्यांना हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा)

टेनिस खेळावर मनापासून प्रेम करणारा खेळाडू अशी आपली ओळख असावी असं पेसला वाटतं. त्याबद्दल तो म्हणतो, ‘टेनिसवर माझं मनापासून प्रेम होतं आणि राहील. आणि माझ्या आतापर्यंतच्या प्रवासातून युवा खेळाडूला काही शिकायचं असेल तर त्याने खेळावर प्रेम करायला शिकावं, इतकंच मला वाटतं. तुमच्या अंतर्मनात खेळाविषयी प्रेम असेल, मेहनतीची तयारी असेल आणि स्वत:वर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही मोठी मजल मारू शकता.’

देशासाठी डेव्हिस कप स्पर्धेत खेळताना पेसचा खेळ विशेष बहरायचा. या स्पर्धेत विक्रमी ४३ दुहेरी विजेतेपदं त्याच्या नावावर आहेत. तर तब्बल ३० वर्षं त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या एकेरीत त्याने कांस्य पदक जिंकलं होतं. भारताने वैयक्तिक प्रकारात ऑलिम्पिकमध्ये मिळवलेलं ते दुसरं वैयक्तिक पदक होतं.

यंदा टेनिसच्या हॉल ऑफ फेममध्ये (Tennis Hall of Fame) भारताच्या आणखी एका माजी खेळाडूचं नाव आहे. विजय अमृतराज यांनी टेनिसचे समालोचक म्हणून हे स्थान मिळवलं आहे. आशियातून यापूर्वी चिनी खेळाडू लिना ही एकमेव खेळाडू टेनिसच्या हॉल ऑफ फेमपर्यंत (Tennis Hall of Fame) पोहोचली आहे. त्यानंतर लिअँडरचं नाव सामील होणार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.