बाजार समित्यांमध्ये (Onion Trader Protest) कांदा लिलाव बंद आहे. कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क हटवण्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदवर तोडगा काढण्यात अपयश आल्याने अजूनही व्यापाऱ्यांचा बंद कायम आहे. येत्या दोन दिवसांत व्यापाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी सांगितले.
कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून कांदा लिलाव बंद ठेवले आहेत. या दिवसांत ७ लाख क्विंटल कांद्याची आवक थांबली आहे. इतकेच नाही, तर १०० कोटी रुपयांहून जास्त रुपयांचा व्यवसाय विस्कळीत झाला आहे. त्यामुळे फक्त व्यापाऱ्यांचेच नाही, तर शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. त्यांच्या मागण्यांवर विचारविनिमय करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी, २६ सप्टेंबरला व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासोबत बैठक पार पडली.
(हेही वाचा – Kapil Dev Viral Video : कपिल देव यांचा हातात बेड्या पडलेला व्हायरल व्हीडिओ आणि गौतम गंभीरचं स्पष्टीकरण )
या बैठकीत मंत्री पियुष गोयल म्हणाले की, शेतकरी आणि ग्राहक यांचा संयुक्तपणे विचार करून आम्हाला निर्यात पॉलिसी ठरवावी लागते. कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले, तरी कांद्याचे भाव सरासरी दोन हजार रुपयांवर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कुठेही नुकसान झालेले नाही. ज्या ठिकाणी भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत त्याच ठिकाणी नाफेडमार्फत विक्री होते. त्याचा व्यापाऱ्यांवर कुठलाही परिणाम होणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तत्काळ लिलाव सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कांदा व्यापाऱ्यांना अपेक्षित निर्णय न झाल्याने त्यांनी बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत व्यापाऱ्यांची बैठक होणार असल्याने काही तोडगा निघून लिलाव सुरू करण्याचा निर्णय झाल्यास सोमवारी लिलाव सुरू होऊ शकेल. नाफेडहून थेट कृषी उत्त्पन्न बाजार समितीतून कांदा खरेदी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. यासंदर्भात शुक्रवारी, २९ सप्टेंबरला कृषीमंत्री धनंजय मुंडे, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांची दिल्लीत बैठक घेण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community