बहुचर्चित शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाने सुनावणीच्या कामकाजाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, ६ ऑक्टोबरपासून युक्तिवादाला सुरुवात होणार असून, प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास तीन महिन्यांहून अधिक काळ लागण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 6 ऑक्टोबर 2023 रोजी याचिकाकर्ते उद्धव ठाकरे गटातर्फे (23 सप्टेंबर रोजी) दाखल करण्यात आलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रावर एकनाथ शिंदे गटाचे वकील त्यांचे उत्तर दाखल करतील. 13 ऑक्टोबर 2023 रोजी अपात्रतेबाबतच्या सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्र व्हावी या उद्धव ठाकरे गटातर्फे मागणी करण्यात आलेल्या अर्जावर युक्तिवाद होतील.
13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान अपात्रतात सुनावणीबाबत विधानसभा सचिवालयात दाखल असलेल्या कागदपत्रांची, आदेशांची पाहणी करण्यासाठी, कागदपत्रे शोधण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वकिलांना संधी देण्यात येईल. 20 ऑक्टोबर 2023 रोजी अपात्रतेबाबतच्या सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्र व्हावी, या उद्धव ठाकरे गटाच्या अर्जांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय जाहीर करतील. दाखल झालेल्या कागदपत्रांपैकी कोणते डॉक्युमेंट्स ऍडमिट करायचे व कोणते नाकारायचे यावर 27 ऑक्टोबर 2023 रोजी दोन्ही पक्ष आपापले म्हणणे सादर करतील.
• 6 नोव्हेंबर 2023 – अपात्रतेबाबत निर्णय घेतांना काय मुद्दे विचारात घेतले पाहिजेत, यावर दोन्ही पक्षांनी आपले लेखी म्हणणे सादर करावे व एकमेकांना त्याच्या कॉपीज द्याव्यात.
• 10 नोव्हेंबर 2023-
अपात्रतेबाबत निर्णय घेतांना काय मुद्दे विचारात घेऊन नक्की केले पाहिजेत यावर विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकतील.
• 20 नोव्हेंबर 2023- प्राथमिक तपासणी घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी त्यांच्या साक्षीदारांची यादी व प्रतिज्ञापत्र दाखल करावेत.
• 23 नोव्हेंबर 2023 – या तारखेपासून उलट-तपासणी सुरू होईल आणि आवश्यकतेनुसार तसेच दोन्ही पक्षांच्या वकिलांच्या सोयीनुसार तारखा देण्यात येतील. शक्य असेल त्याप्रमाणे उलट-तपासणी आठवड्यातून दोनदा घेण्यात येईल.
•अंतिम युक्तिवाद – सगळ्यांचे म्हणणे-पुरावे ऐकून घेण्याची वरील सर्व प्रक्रिया संपल्यावर दोन आठवड्यानंतर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरवली जाईल.