अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलीस दल सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. मुंबईतील रस्त्यावर २० हजार पोलिसांच्या फौजफाट्यासह राज्यराखीव दलाच्या तुकड्या, गृहरक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा दल आणि नागरिक सुरक्षा दल तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी शहरातील विसर्जन मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गावर वळविण्यात आली असून अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई महानगर पालिकेसह मुंबई पोलीस दल देखील सज्ज झाले आहे. मुंबई महापालिका प्रशासनासोबत मुंबई पोलिसांनी समन्वय साधून विसर्जनाच्या दिवशी विशेष नियोजन केले गेले आहे. कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये व निर्विघ्नपणे विसर्जन सोहळा पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांकडून काळजी घेण्यात येत आहे. मुंबईतील चौपट्या, विसर्जन घाट, तलाव यांसह मिरवणूक सोहळा मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलातील ८ अप्पर पोलीस आयुक्त, २५ पोलीस आयुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह २ हजार ८६६ पोलीस अधिकारी आणि १६ हजार २५० पोलीस अंमलदार असा एकूण २० हजार पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या ३५ प्लाटून, शीघ्रकृती दल, रॅपिड ऍक्शन फोर्सच्या तुकड्या होमगार्ड, स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते असा पोलीस बंदोबस्त विसर्जनाच्या दिवशी मुंबईत तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Lentils Price Hike : मसूर डाळीच्या कॅनडातून होणाऱ्या आयातीवर परिणाम; किमतीत वाढ होणार का ?)
गिरगाव, जुहू, दादर चौपाटीसह इतर लहान चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून यासाठी वेगळे नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहे. मुंबईतील मोठ्या मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूका त्याच बरोबर चौपट्यांवर ड्रोन कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवले जाणार आहे. साध्या वेशातील पोलिसांना तैनात करण्यात येणार असून मिरवणुका तसेच गर्दीची ठिकाणे आणि विसर्जन घाटावर संशयास्पद हालचालींवर साध्या वेशातील पोलीस लक्ष ठेवून असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community